उद्देश
आता असे म्हणणे जास्त योग्य ठरेल की आजची लहान मुले ‘फक्त देशाचे नाहीत तर निसर्गदेवतेचे भवितव्य’ आहेत. आमचे ध्येय हे आहे की जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचणे, त्यांना आजच्या आणि आगामी आव्हानांमागील मूळ कारणाबद्दल जागरूक करणे – ते मूळ कारण म्हणजे ‘आपले स्वतःचे आजचे वर्तन’.
असे आम्हीं का म्हणत आहोत?
थोडे मागे वळून पाहिले तर असे लक्षात येईल की आपण जीवनाच्या अनेक क्षेत्रांत खुप यश मिळवलं आहे. तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे विशेषत: गेल्या दोन दशकांत (इ.स. २०००-२०२०) आपल्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल झाले आहेत.
परंतु, नाण्याची दुसरी बाजू पाहिल्यास अभूतपूर्व ‘वाढ’ आणि ‘विकास’ साधत असूनही, “आपण समाधानी आहोत?” “आपण आनंदी आहोत?” हे प्रश्न आपण स्वतःला विचारले तर त्यांचे प्रामाणिक उत्तर ‘नाही’ असेच आहे. आपल्या सर्वांना सर्वच स्तरांवर अडचणी येत आहेत; वैयक्तिक, सामाजिक आणि पर्यावरणीय. अनैसर्गिक भौतिक विकास आणि परिणामतः वाढलेला भोगवाद हे सर्व समस्यांचे मूळ कारण आहे कारण असा विकास निसर्ग देवतेचे मोल देऊन होत आहे.
‘निसर्गायण’ पुस्तकाचे लेखक आदरणीय श्री. दिलीप कुलकर्णी यांनी अगदी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “सध्याची संकटे ही ‘अभूतपूर्व यश मिळूनही’ निर्माण झालेली नाहीत तर ‘अभूतपूर्व यशामुळे’ निर्माण झाली आहेत.” किती खरं आहे हे! २०१९-२०२१+ या कालावधीतील कोविद१९ हा रोग हे एक मोठे उदाहरण आहे. या संकटाने मनुष्यजातीला आरसा दाखविला आहे.
आता आपल्या वागण्यात, कृतीत बदल करण्याची वेळ आली आहे.
ध्येय
आम्ही आपली भावी पिढी जाणीवेच्या विकासासाचा, नैतिक पातळीवर व्यक्ती आणि समाजाची उन्नती करण्यास मदत करणाऱ्या अशा जीवनशैलीचा विचार करताना पाहू इच्छितो ज्यामुळे आपोआपच पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकेल. जीवनशैली जी मानव-केंद्रित असण्याऐवजी पर्यावरण-केंद्रीत असेल. जी साधी, आपले उपभोग व हाव नियंत्रित ठेवणारी आणि निसर्गाला मर्यादा आहेत हे शहाणपण निर्माण करणारी असेल. आपल्याला त्या मर्यादांचा आदर करावा लागेल; इतर सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंसह सहजीवन व सहकार्य प्रस्थापित करुनच.