शाश्वत जीवनशैली
मानवजात खरंच कधी निसर्गाच्या चक्रीयतेचा भाग होऊ शकेल का? की निसर्गाविरूद्ध युद्ध असेच चालूच ठेवेल आणि पर्यावरणीक दुवे तोडून निसर्गाची शाश्वतता पूर्णपणे खंडित करेल?
निसर्गातील संसाधने कधीही संपत नाहीत अशी खोटी धारणा करुन घेऊन व रेखीय वाढ साधण्याचा प्रयत्न करून आपण निसर्गाची चक्रीयता तोडत आहोत.
अत्यंत स्वार्थी वृत्तीने आणि सक्तीने आपण सर्व चांगल्या वस्तू निसर्गाकडून ओरबाडत आहोत आणि निसर्गाचा देवाण-घेवाणीचा अलिखित नियम मोडत आहोत. आपण परत जे काही देतो ते विषारी, अविघटनशील व विनाशकारी असते.
आपण असे गृहित धरत आहोत की आपण निसर्गात कशावरही अवलंबून नाही त्यामुळे आपण कशाचीही तमा बाळगणे सोडून दिले आहे.
आपली विचारप्रणाली आणि जीवनशैली पर्यावरण-केंद्रीत करण्याऐवजी ती आपण मानव-केंद्रीत केली आहे.
प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूला समान महत्त्व देण्याऐवजी आपण फक्त मानवजात श्रेष्ठ म्हणून तिलाच महत्व असे वागत आहोत.
विविध नैसर्गीक प्रक्रियांमध्ये अडथळे आणून आणि निसर्गाचा विनाश करून आपण एक प्रचंड असंतुलीत परिस्थिती निर्माण केली आहे. आपण निसर्गाची विविधता नष्ट केली आहे.
आपण नैसर्गिक विकेंद्रीकरणाकडे दुर्लक्ष करून बर्याच गोष्टींचे केंद्रीकरण केले आहे आणि हातातील समस्या सोडवण्यापेक्षा अनेक नवीन समस्या निर्माण केल्या आहेत.
आपण निसर्गाच्या मर्यादा समजूनच घेतल्या नाही किंवा त्या विसरलो आहोत आणि असीम वाढीचा विचार करीत आहोत. जो प्रत्यक्षात आपल्याला अशाश्वत विकासाकडे म्हणजेच सर्वनाशाकडे घेऊन जात आहे आहे.
येथे भारतात, आपल्या पूर्वजांना निसर्गाची वैशिष्ट्ये, सजीव आणि निर्जीव वस्तूंमधील परस्पर संबंध, आंतर-अवलंबित्व, विविधता, मर्यादा आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे भविष्यात मानवजातीची कुतुहल आणि शोधाची वृत्ती निसर्गाविरोधात विजयी होण्याच्या शक्यतेमध्ये बदलू शकेल व त्यामुळे कोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल याचे चांगलेच ज्ञान झाले होते.
त्यांनी लोकांना निसर्गाशी सहकार्याने आणि सुसंगत राहण्यासाठी नेहमी मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांनी आपल्या जीवनशैलीचा एक भाग म्हणूनच निसर्गाची ओळख करुन दिली. उत्सव केवळ सामर्थ्यवान निसर्गाची आणि त्याच्या सामर्थ्याची उपासना करण्यासाठीच नव्हे तर प्राणी, वनस्पती, कीटक आणि इतर गोष्टींचा एक किंवा अधिक सणांशी संबंध जोडून त्यांचे अप्रत्यक्षरित्या संरक्षण करण्यासाठी अस्तित्त्वात आले. गुढी पाडवा-कडुनिंब, वट पौर्णिमा-वटवृक्ष, नारळी पौर्णिमा-नारळ, गणेश चतुर्थी-दुर्वा, विजयादशमी-आपटा, नागपंचमी-नाग, तुलसी विवाह – तुळस अशी त्यांच्या शहाणीवेची अनेक उदाहरणे आहेत. एवढेच नव्हे तर आपले ग्रंथ-साहित्य हे सांगते की आपल्या ऋषीमुनींनी ‘वन महोत्सव’ उपक्रमांचे आयोजन केले आणि त्यांस कायम प्रोत्साहन दिले. आपण विश्वास ठेऊ शकू का किंवा कल्पना करू शकू का की ज्या युगात भरपूर जंगले आणि कमी लोकसंख्या होती अशा वेळी असे उपक्रम कोणाच्या मनातही येऊ शकतात? परंतु आमच्या ऋषींमध्ये ती दूरदृष्टी होती, भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे त्यांना ठाऊक होते आणि म्हणूनच त्यांनी अखिल मानवजातीचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
बदलत्या हवामानानुसार आणि ऋतुमानानुसार वर्षभर काय खावे, कधी काय टाळावे हे सुद्धा त्यांनी लिहून ठेवले – फक्त आपल्या चांगल्या आरोग्यासाठी.
आज आपण याच्या अगदी उलट आणि निष्काळजीपणाने वागतो आहोत. फक्त एक उदाहरण पुरेसे आहे – वट पौर्णिमेला वडाच्या झाडाच्या फांद्या कापल्या जातात, स्त्रिया त्या रस्त्यावर खरेदी करतात, घरी आणतात आणि पूजा करतात. ज्या वेगाने आणि संख्येने वडाच्या फांद्या तोडल्या जातात ते पाहता आधिच कमी झालेली वडाची झाडे इथुन पुढे कुठे शिल्लक तरी रहातील का? आपल्या पूर्वजांनी जी शहाणीव रुजविण्याचा प्रयत्न केला ती हीच शहाणीव आहे काय?
चला हा निष्काळजीपणाचा दृष्टीकोन बदलू या आणि जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे सर्वांनी वृक्ष लागवड सुरू करूया. आपण आपल्या स्वतःच्या सणांच्या संकल्पनेचा निदान त्या त्या सणांशी संबंधित झाडे लावण्यासाठी आणि ती आत्मनिर्भर होईपर्यंत त्यांची काळजी घेण्यासाठी उपयोग करू या.
वरील व्हिडिओ आम्ही काय सांगत आहोत याची फक्त एक झलक देतो. प्रत्येकाने तो पहावा, विचार करावा आणि प्रत्यक्ष ‘कृती’ करावी.
व्हिडिओ श्रेय: Nature Shala
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.