आपली जंगलं वाचवा
माणसाने भविष्याबद्दल अटकळ बांधण्याची आणि एखादी गोष्ट घडण्यास अटकाव करण्याची क्षमताच गमावली आहे, तो या जगाला संपवूनच संपेल – अल्बर्ट श्वीट्झर
वरील उल्लेख जरी आजच्या परिस्थितीला पूर्णपणे अनुसरुन असला, तरी हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांकडे शहाणीव, दृष्टी आणि दूरदृष्टी सुद्धा होती. ते जंगलांच्या जवळपास राहत असत आणि जंगलांचे महत्त्व त्यांना चांगलेच ठाऊक होते. त्या वेळी, त्यांना मानवी लोभाबद्दल चांगल्या प्रकारे माहिती होती जो केवळ सृष्टीचे नुकसानास कारणीभूत होणार नाही तर माणसालाही विनाशाकडे नेईल.
मानवी हल्ल्यापासून जंगलांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी ‘देवराई’ ही संकल्पना आणली. या देवराया राखण्यासाठी त्यांनी त्यांचा संबंध स्थानिक देवदेवता किंवा पूर्वजांशी जोडला आणि निसर्गाच्या संवर्धनास आध्यात्मिक आयाम दिला. अशा पवित्र देवरायांचा एक आलिखित नियम असा होता की तेथील प्रत्येक गोष्ट तिथे राहणाऱ्या देवतेच्या संरक्षणाखाली आहे. त्या देवतेची परवानगी घेतल्याशिवाय तेथून काहीही नेता येणार नाही. संस्कृती आणि पर्यावरणाच्या सहजीवनाचे हे एक परिपूर्ण उदाहरण होते.
पवित्रतेच्या संकल्पनेने आपल्या देशातील जैविक विविधता संरक्षित केली. आज अशा हजारो प्राचीन पवित्र देवराया ओळखल्या जातात ज्या आश्चर्यकारक अशाजैवविविधतेची कोठारं आहेत, दुर्मिळ वनस्पतींचा साठा आहेत आणि अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी यांचे निवासस्थानं आहेत.
शेती आणि वसाहतींसाठी जंगले साफ करण्याच्या माणसाच्या उद्योगापुढे स्थानिक जैवविविधतेचे शेवटचे अवशेष या देवरायांच्या रुपाने शिल्लक आहेत.
पवित्र देवरायांचे ऐतिहासिक दुवे शेतीपूर्व, शिकार करून आणि निसर्गातील आवश्यक गोष्टी गोळ करून जगणाऱ्या प्रागैतिहासिक मानव समाजात सापडतात. आजही दुर्मिळ आणि लुप्त होण्याच्या मार्गावरील स्थानिक वनस्पतींचा बीजस्रोत म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. तेथे आजही दुर्मिळ आणि संकटात सापडलेले प्राणी, पक्षी आणि कीटकांच्या प्रजाती निवास करतात. झाडे माती धरून ठेवतात व तीची धूप थांबवतात आणि जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून जिरवण्यास मदत करतात. यामुळे नद्या, नाले, तळी, तलाव आणि विहिरी यासारख्या जलस्त्रोतांना वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो. हे घडते कारण जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी झटकन वाहून जात नाही. ते जंगलाच्या मातीत शोषून घेतले जाते आणि हळूहळू भूमिगत वाहून या स्रोतांना पाणीपुरवठा करत राहते.
झाडांच्या पानांपासून होणाऱ्या बाष्पोत्सर्जनामुळे आर्द्रता आणि तापमान कमी होते आणि स्थानिक पातळीवर सूक्ष्म पर्यावरण तयार होते जे जीवांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असते.
‘विकासाच्या’ नावाखाली आपण अनेक देवराया नष्ट केल्या आहेत. आता ज्या काही शिल्लक आहेत त्या आपल्या सांस्कृतिक आणि विशेष म्हणजे पर्यावरणीय वारशाचे प्रतिनिधित्व करतात म्हणून त्यांचे संरक्षण केलेच पाहिजे. फॉरेस्ट ॲक्ट्स कदाचीत जंगलांचे संरक्षण करू शकणार नाहीत, मात्र आपले वर्तन नक्कीच करू शकेल…
वरील व्हिडिओ आम्ही काय सांगत आहोत याची फक्त एक झलक देतो.
प्रत्येकाने तो पहावा, विचार करावा आणि प्रत्यक्ष ‘कृती’ करावी – आपल्या स्वतःलाच वाचविण्यासाठी!.
व्हिडिओ श्रेय: The News Minute
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.