दोन मातांची एक कहाणी
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अंजना आणि भूमी या दोन मातांची कहाणी.
आई ही प्रत्येक घराची केंद्रबिंदू असते. कुटुंब आणि तिच्या मुलांचे कल्याण यासाठी असलेली तिची वचनबद्धता अतुलनीय आहे. ती संपूर्ण कुटुंबाला संस्कार देणारी आहे. ती घरातल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेते. आईचे कल्याण हा कुटुंबाच्या कल्याणाच्या प्राथमिक सूत्रातील प्रमुख घटक आहे. तिच्याशिवाय जगण्याचे चक्र थांबते किंवा त्यात अनेक व्यत्यय येतात.
या कथेतील दोन माता त्रस्त आहेत आणि म्हणूनच त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यात त्या असमर्थ आहेत.
अंजना ही गृहिणी आहे. तिच्या हृदयाची प्रकृती गंभीर होती. सर्व प्रकारची औषधे सुरु होती. तिला मैत्रिणीने योग करण्याची सूचना देखील केली होती. हे सिद्ध झाले आहे की योग ही शरीर आणि मन बरे करण्याची महान शक्ती आहे. हे विज्ञानापेक्षा दीर्घकालीन फायद्याचे ठरू शकते.
अंजनाने नियमितपणे योग सराव सुरू केला. जे बीज पेरले ते रोपामध्ये परिवर्तित झाले. फायदे हळूहळू प्रकृती सुधारणेसह दिसू लागले. डॉक्टरांकडे जाणे आणि औषधे कमी झाली. लवकरच ती मुलांचे पालनपोषण करण्यात आणि कुटुंबाची चांगल्या प्रकारे देखभाल करण्यास सक्षम झाली. घरचे वातावरण पुन्हा चांगले झाले. सर्व कुटुंब पुन्हा अभ्यास आणि कामाच्या मार्गावर लागले. हळूहळू रोपाचे फळं येणाऱ्या झाडात रुपांतर झाले. कुटुंबातील सर्व सदस्यांनी योग शिकण्यास सुरुवात केली आणि ते कौटुंबिक संस्कृतीचा भाग बनले. यामागे आई नावाची शक्ती कार्यरत होती आणि चांगल्या प्रकारे कार्य पार पाडत होती – उत्तेजन देणारी, बिंबवणारी.
त्याचप्रमाणे भूमी अर्थात आपली पृथ्वीमाता सुद्धा त्रस्त आहे!
तिला मोकळ्या श्वासाची गरज आहे. तिला पोषणाची आवश्यकता आहे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणांची नाही. आपल्या कर्मांचे परिणाम सहन करण्याची तिची क्षमता कमी होत आहे. प्रदूषण कमी करणे, इतर सजीवांचा विचार करणे – प्राणी, पक्षी, कीटक, झाडे, इत्यादी व वृक्षारोपण आणि जंगले तयार करणे यामुळे तिला बरे करता यईल आणि मोकळा श्वास घेता यईल. असे केल्याने अंजनाच्या कुटुंबाप्रमाणे पृथ्वीमातेचे कुटुंब, जे संपूर्ण जग ते पुन्हा फुलेल. तिला एकोप्याने जगण्यासाठी तिच्या कुटुंबाची, संपूर्ण परिसंस्थेची आवश्यकता आहे.
योग आपल्याला काय शिकवितो?
भगवान पतंजली हे विश्वाचे पालनकर्त्या भगवान विष्णूचे आसन असलेल्या आदिशेशाचा अवतार मानला जातात.पतंजली योगाचे आठ अंग किंवा विभाग सांगतात (अष्टाङ्ग). ते आठ विभाग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि.
योगाचे ठळक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. सध्याच्या साथीच्या आजारात श्वसन सुधारणे, ऊर्जा वर्धन आणि जीवनशैली सुधारणे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. योग आपल्याला अंतर्मुख होण्यास मदत करतो.
योग सत्राची सुरवात पतंजलीची आराधना करुन होते.
योगेन चित्तस्य पदेन वाचां।
अर्थ: चित्त शुद्ध करण्यासाठी, चैतन्य शुद्ध करण्यासाठी, पतंजलीने योगशास्त्र (योगेन) आपल्याला दिले.बोध: त्याचप्रमाणे पृथ्वीने वृक्ष लागवड करून आणि नैसर्गिक स्त्रोतांचा आदर करून पर्यावरण शुद्ध राखण्याचे एक शास्त्र दिले आहे.
मलं शरीरस्य च वैद्यकेन॥
अर्थ: शरीराची अशुद्धता (मल) काढून टाकण्यासाठी, त्याने आम्हाला औषध विज्ञान दिले (वैद्यकेन).बोध: तशाचप्रकारे पृथ्वीने आपल्याला पाण्यासारखी नैसर्गिक संसाधने दिली आहेत ज्यामुळे आपल्या अशुद्धी दूर होतात. यातून शिकून आपण सर्व जीवांचे जीवन निर्मल व शुद्ध बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां।
अर्थ: ज्याने आपल्याला या गोष्टी दिल्या आहेत त्याच्याजवळ मला जाऊ दे.बोध: तशाचप्रकारे आपण सर्वजण निसर्गाशी जोडले जाऊ आणि त्याच्या जवळ जाऊ.
पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि॥
अर्थ: भगवान पतंजलीला माझ्या जोडलेल्या हातांनी डोके टेकवून नमस्कार.बोध: त्याचप्रमाणे, पृथ्वी मातेने दिलेल्या सर्व गोष्टींबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे.
आबाहु पुरुषाकारम्।
शङ्खचक्रासि धारिणम्॥
सहस्र शीरसं श्वेतम्।
अर्थ: हातापासून डोक्यापर्यंत त्याला माणसाचा आकार आहे. त्याने हातात शंख आणि चक्र धारण केले आहे. त्याच्या डोक्यावर नागाचे सहस्त्रावरण आहे, कारण तो आदिशेशाचा अवतार आहे. श्वेतम् म्हणजे पांढरा.बोध: त्याचप्रमाणे, पृथ्वीच्या शरीरावर महासागर, पर्वत आणि जंगले आहेत. तिच्या असंख्य हातांनी ती आपल्याला पाहिजे ते देण्यासाठी तयार आहे. ‘घ्यायचे’ की ‘ओरबाडायचे’ते आपल्याला ठरवायचे आहे.
प्रनमामि पतञ्जलिम्॥
अर्थ: मी पतंजलीला नमन करतो.बोध: अमर्याद कृतज्ञतेसह आपण पृथ्वी मातेला नमन करूया.
योग जसे स्वत:ला निरोगी करण्याचे आणि अंतर्मुख होण्याचे साधन आहे तसेच झाडांचे आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण हे पृथ्वी मातेला निरोगी ठेवण्याचे साधन आहे. आनंदी जीवन निरोगी जीवनापासून सुरू होते. प्रत्येक घरात मातेची जी भूमिका असते तीच भूमिका पृथ्वी मातेची प्रत्येक माणसासाठी आहे. जर घरातील आई स्वस्थ नसेल तर घर कोलमडते मग आपण पृथ्वीमातेकडे कसे दुर्लक्ष करू शकतो? निरोगी जीवनासाठी एक भरभराट झालेली, तेजस्वी, निरोगी पृथ्वी आवश्यक आहे. कृपया झाडे जगवा, झाडे लावा, पर्यावरणाचे संरक्षण करा आणि निसर्गाची काळजी घ्या.
मराठीत एक म्हण आहे “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी”. हे आपल्या सर्वांसाठी शब्दशः लागू आहे. पृथ्वीमाता सुदृढ नसताना आपण कितीही पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक गोष्टी मिळविल्या तरी चांगल्या जीवनासाठी भीक मागावी लागेल कारण आपण जे मिळवू त्यातून आपल्याला चांगले जीवन नक्कीच मिळणार नाही.
अभ्यासक: दिलीप ओछानी
वाचायला विसरू नका: वनराई, आपली जंगलं वाचवा, आपलं पाणी वाचवा, पुनःप्रक्रिया आवश्यकच परंतु…, विचार शाश्वततेचा, शाश्वत जीवनशैली