सुखाच्या शोधात…
आज प्रत्येक माणसाला सुख खूप महत्वाचे आहे व म्हणूनच सुख हवे आहे. सुख मिळविण्यासाठी प्रत्येक माणूस काहीही करू शकतो आणि या सुखासमाधानासाठी तो जिवघेण्या शर्यतीत सहभागी होतो, मोठ्या सुखा साठी आयुष्यातील छोटे पण अतिशय महत्त्वपूर्ण क्षण तो गमावून बसतो, सुखासाठी तडजोड सुरु करतो आणि या तडजोडी मध्ये स्वतः ला हरवतो आणि मग सुरु होते नाकारतमकता, नैराश्य, अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो याचे दुःख, सुखाचा डोंगर चढत असताना दुःखाची दरी केव्हा लागते हे त्याला कळतच नाही.
हा सुखाचा शोध घेत असताना मला बरेच विचार वाचण्यात आले त्यातले दोन विचार मी इथे मांडत आहे.
पहिला अब्राहम मॅस्लो हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, त्याने १९४३ मध्ये एक सिद्धांत “मॅस्लो गरजांचा पदक्रम” (Maslow’s hierarchy of needs) मांडलेला आहे त्यानुसार मानवतावादी मानसशास्त्राची मूलभूत आणि महत्वाची सोप्पी तत्त्वे तो अशी मांडतो-
१. कोणाच्याही आयुष्यात तो सद्य स्तिथीत काय करतो आहे हे अतिमहत्त्वाचे आहे न की त्याने भूतकाळात काय केले वा तो भविष्यात काय करेल.
२. मानसिक दृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी, प्रत्येकाने आपल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी घेणे आवश्यक आहे, याची पर्वा न करता की कृती सकारात्मक आहे कि नकारात्मक.
३. प्रत्येकजण हा जन्मापासूनच गुणवान, सपात्र असतो. जरी त्याच्याकडून काही नकारात्मक काम झाले असेल तरी ते काम त्याची पात्रता कमी करत नाही.
४. जीवनाचे अंतिम ध्येय हे स्वतःची प्रगती, अर्थबोध आहे. हे शक्य आहे फक्त स्वयंसुधारणा आणि स्वतः बद्दलच्या समजेतुन.
मॅस्लो गरजांचा पदक्रम हा माणसाच्या मूलतः वर्तवणूकीतील प्रेरणा स्रोतांवर प्रकाश टाकतो. मॅस्लो म्हणतो शारीरिक गरज, सुरक्षितेची गरज, सामाजिक गरज, स्वतःबद्दल आदर आणि आत्मप्राप्ती ह्या गरजा माणसाच्या प्रेरणेची कार्यप्रणाली दर्शवतात. म्हणजेच गरजेचा प्रत्येक पुढचा स्तर पादाक्रांत करण्याची प्रेरणा तेव्हाच मिळेल जेव्हा मनुष्य आधीच्या गरजेचा स्तर पूर्ण करेल म्हणजे त्याच्या प्रगतीचा एक टप्पा पूर्ण होईल. त्यासोबतच हा पदक्रम मानवीय वर्तवणूक समजण्यासाठी मुख्य पाया आहे की कसे प्रयत्न आणि प्रेरणा एकमेकांशी सहसंबंधित आहेत. हा प्रत्येक स्तर काही आंतरिक संवेदनांनी बनलेला आहे आणि त्या सर्व पूर्ण होणे हे पदक्रम पूर्ण होण्यासाठी प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. मॅस्लो गरजांच्या पदक्रमाचे सर्वोच्च ध्येय आत्मबोध हे आहे.
प्रत्येकाला स्वतःच्या प्रगतीसाठी गरजांची तीव्रता ओळखणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी हा सोबतचा आलेख बघा. हा आलेख सर्वसाधारण मनुष्यासाठी एकामागून एक येणारे वेगवेगळे टप्पे दर्शवितो. काही लोकांसाठी हे असेच सलग टप्पे एका मागे एक असतीलच असे नाही. कदाचित कुणाला आत्मबोध खुप आधीच होईल.
दुसरा विचार आहे स्वामी विवेकानंदांचा “राजयोग”.
स्वामी विवेकानंद म्हणतात प्रत्येकाच्या ठायी अनंत ज्ञान व शक्ती वास करीत असते . ही दोन्ही जागृत करण्याचा मार्ग राजयोगात दर्शविला आहे. प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म होय. बाह्य आणि आंतर प्रकृतीला वशीभूत करून स्वतःचे हे अव्यक्त ब्रह्मस्वरूप व्यक्त करणेच जीवनाचे परम उद्दिष्ट होय. कर्म, उपासना, मन:संयम वा ज्ञान यांपैकी कोणत्याही एकाचा वा एकापेक्षा अधिकांचा किंवा सर्वच उपायांचा अवलंब करून ते उद्दिष्ट्य साधा आणि मुक्त व्हा. यातच सगळा धर्म आला. मते, वाद, क्रियाकांड, अनुष्ठाने, शास्त्रे, मंदिरे वा इतर बाह्य गोष्टी केवळ गौण तपशिलाच्या बाबी होत.
महर्षी पतंजलीच्या योगसूत्रांवर स्वामी विवेकानंदानी भाष्य केले आहे. पतंजलीच्या योगसूत्रांचा अवलंबन म्हणजेच राजयोगाचे पालन करणे.
योग काय आहे? जर तुम्ही समजत असाल की योग म्हणजे फक्त शरीराला वाकवणे आणि कसरत करणे तर परत विचार करा. सोप्या शब्दात योग म्हणजे काळजी घेणे तुमच्या शरीराची, मनाची आणि श्वासाची. योग म्हणजे प्राणायाम, योगासन आणि ध्यान यांच्या मदतीने तुमच्या शरीरात, मनात आणि श्वासात सुसंवाद साधणे. महर्षी पतंजली यांची योगसूत्रे ही भारतीय मानसशास्त्राचा प्रमुख आधार असल्यामुळे त्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. चंचल मनाला एकाग्र करून समाधीत कसे लीन करावे हे योगसूत्रात स्पष्ट करून सांगितले आहे. पतंजलींनी योगाची अष्टांग अंग सांगितले आहेत, ते आहेत यम , नियम, आसन, प्राणायाम, धारणा, प्रत्याहार, ध्यान, आणि समाधि.
राजयोग अशी घोषणा करतो की, प्रत्येक वक्तीच्या पाठीशी ज्ञानाचा आणि शक्तीचा अनंत समुद्र विद्यमान असून, प्रत्येकजण जणू काही त्या समुद्रात एकेक लहानसा कालवा आहे. राजयोगाची मानवजातीला अशी शिकवण आहे की वासना आणि गरजा जशा माणसाच्या आतच असतात तद्वतच त्या पूर्ण करण्याची शक्तीदेखील त्याच्या आतच वसत असते; आणि कुठेही व केव्हाही एखादी वासना, एखादा अभाव किंवा एखादी प्रार्थना पूर्ण होते तिथे तिथे आणि तेव्हा तेव्हा ह्या अनंत साठ्यातूनच कुमक आलेली असते असे निश्चित समजा.
भारतातील सर्वच आस्तिक तत्वज्ञानांचे अथवा वेदांना प्रमाण मानणाऱ्या तत्वज्ञानांचे एकमेव ध्येय आहे - पूर्णत्व प्राप्त करून घेऊन आत्म्याची मुक्ती साधणे. त्याचा उपाय आहे - योग.
अभ्यासक: बाबासाहेब म्हस्के