हसरे पर्यावरण
पर्यावरणाच्य वैशिष्ट्यांची किंवा समस्यांची केवळ माहिती देऊन हे पुस्तक थांबत नाही; तर पर्यावरणाची जी एक दृष्टी मुलांच्या मनात विकसित व्हावयास पाहिजे, ती निर्माण करते. ही दृष्टी अधिकाधिक विकसित करून पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी काय काय करता येईल, हे नेमकेपणाने सांगते. हसत खेळत चाललेल्या गप्पांमधून एकीकडे मुलांना रंजकपणे विषयाची माहिती मिळत राहतेच; पण त्याचबरोबर समस्या आणि उपाय ह्या दोन्हींशी आपण अतूटपणे जोडलेले आहोत, हे जाणवत राहून मुलांना कृतीसाठीही प्रेरणा मिळते.
७वी ते ९वी ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अपरिहार्य आहे.
तुंम्ही कोळ्याचं जाळं पाहिलं आहे ना? त्याला अनेक आधार असतात, आणि त्या आधारांना जोडणारे धागे असतात. त्यातल्या कोणत्याही आधाराला आपण धक्का लावला तरी सगळं जाळं हादरतं. एक आधार तोडला तर सगळं जाळं लुळपांगळं होतं. आपली पर्यावरणाची जी व्यवस्था आहे ती अशी कोळ्याच्या जाळ्यासारखी आहे. हवा, पाणी, जमीन, हिरव्या वनस्पती असे काही या जाळ्याचे आधार आहेत - 'जीवनाचे आधार'. मानवाचे सर्व व्यवहार आहेत तसेच चालू राहिले, तर थोड्याच काळात ही सगळी व्यवस्था कोसळून पडेल. हे टाळण्यासाठी ह्या व्यवस्थेचा अभ्यास करायचा. आपलं कुठं चुकतं आहे हे बघण्यासाठी हा अभ्यास करायचा. - श्री. दिलीप कुलकर्णी, निसर्गस्नेही विचारवंत आणि लेखक