11
Apr
रानवाटा
0 Comment

वन्यजीवांच्या निरीक्षणासाठी एकट्यानं जंगलातील वाटेनं जायला हवं. असं जाऊ लागलं की जंगलातल्या विलक्षण शांततेची जाणीव होऊ लागते. कुठं एखादं पान टपकन् पडतं. कुठं वाऱ्यानं वृक्षांचे शेंडे सळसळू लागतात. कुठं वाऱ्यानं पाचोळा वाजतो, तर कुठं बांबूच्या बेटातून विलक्षण आवाज येतो. वाटतं एखादा बिबटा वाघ तर वाढलेल्या गवतातून दबा घरून मागं मागं येत नसेल? समोर एखाद अस्वल तर भूतासारखं उभं राहणार नाही? म्हणून कान अधिक तीव्र होतात. नजर आणखी तीक्ष्ण होते. न कळत मनाची एकाग्रता वाढू लागते. मन हळूहळू शून्यात जातं. योगसाधनेतील ही अत्यंत कठीण अवस्था जंगलात वन्यजीवांचं निरीक्षण करताना सहज प्राप्त होते.
वन्यजीव निरीक्षण ही एक साधना आहे. एक तप आहे. ही साधना ज्याला साधते तो भाग्यवानच. या साधनेमुळंच जंगली हत्तींचा अभ्यास करणारा पालकाप्य, रघुवंशातील कांचनमृगाबरोबर दूर्वांकूर खाऊन राहणारा शातकर्णी, रानबकऱ्यांचा अभ्यास करणारा अज, रानमेंढ्यांचे अध्ययन करणारा जाबाली, ही सारी थोर माणसं त्यांनी आयुष्यभर केलेल्या साधनेमुळेच ऋषीमुनींच्या पदाला पोहोचली - श्री. मारुती चितमपल्ली, वनअधिकारी आणि लेखक