पुनःप्रक्रिया आवश्यकच परंतु…
होय, हे खरे आहे की हे प्रकाशचित्र नयनरम्य नाही, पण हे सुद्धा तितकेच खरे आहे की त्याने सादर केलेली वास्तविकता सुद्धा नयनरम्य नाही!
आजकाल या गोष्टीची सर्वत्र चर्चा आहे की कचऱ्यावर पुनःप्रक्रीया करायला हवी. वापरा आणि फेका ऐवजी पुनःप्रक्रीया करा असे म्हटले जात आहे. पण या प्रकारे, दुर्दैवाने, समस्येचे निवारण करण्याऐवजी आपण नवीन समस्या निर्माण करत आहोत. पुनःप्रक्रीया करण्यासाठी नवनवीन प्रकल्प उभारले जातात, नवे उद्योग सुरु होतात. परंतु नंतर अशा कचऱ्याचे नियंत्रण व प्रक्रियेचा उद्देश नाहीसा होऊन ते उद्योग जिवंत ठेवण्यासाठी सगळी शक्ती पणाला लागते. त्याची परिणती जितका जास्त कचरा आपण निर्माण करु तितका अधिक ‘कच्चा माल’ मिळेल या विचारधारेत होते. शिवाय जर ते ज्या दराने कचरा तयार होत आहे त्या दराने प्रक्रिया करू शकत नसतील तर मग हा कचरा कुठेतरी टाकला जातो जो जल, वायू, माती प्रदूषणास कारणीभूत ठरतो. कितीतरी वेळा छोटे देश मोठ्या देशांसाठी कचऱ्याचे आगार बनतात.
असे म्हणतात की आपण तयार केलेल्या पॉलिथिन कचऱ्याचे प्रमाण इतके मोठे आहे की जर आपण त्या कचर्यामधून एक पिशवी तयार केली तर संपूर्ण पृथ्वी त्या बसू शकेलआणि वरुन त्या बॅगला आपण सहजपणे गाठ बांधू शकू!
यावर उपाय हाच की, ‘ निसर्गायण या पुस्तकाचे लेखक श्री. दिलीप कुलकर्णी यांनी सांगितल्यानुसार – आपाल्या रोजच्या जीवनाची चतुःसुत्री अशी असावी
१. Refuse (वापर टाळू)
२. Reduce (वापर कमी करू)
३. Reuse/Repurpose (पुनर्वापर करू)
४. Recycle (पुनःप्रक्रिया करू)
Refuse (वापर टाळू): प्रथमतः आपण अशा सर्व गोष्टी वापरण्यास पूर्ण नकार देऊया ज्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होण्याची शक्यता असेल, ज्यामुळे अविघटनशील कचरा निर्माण होईल आणि ज्यामुळे निसर्गाच्या कोणत्याही प्रकारच्या कचऱ्याचे विघटन करण्याच्या दरापेक्षा जास्त वेगाने कचरा निर्माण होईल. अशा गोष्टींना पर्याय शोधूया. उदाहरणार्थ, पॉलिथीन बॅगऐवजी कापडी पिशव्या वापरुया.
Reduce (वापर कमी करू): नकाराची पहिली गाळणी वापरल्यानंतर अशा ज्या गोष्टी उरतील ज्यांचा वापर आपण आज टाळू शकत नाही त्यांच्या बाबतीत आपला दृष्टीकोन ‘मी त्या गोष्टींचा वापर कसा कमी करू शकतो?’, ‘मी त्यांवरील अवलंबित्व कसे कमी करू शकतो?’ असा असावा.
Reuse/Repurpose (पुनर्वापर करू): एक काळ असा आला की ज्यात ‘वापरा आणि फेकून द्या’ (‘यूज अँड थ्रो’) गोष्टींचे एक नवीन युग सुरू झाले. जे सुरुवातीला आकर्षक वाटले – कपडे वापरा आणि फेकून द्या, खेळणी वापरा आणि फेकून द्या, साधने वापरा आणि फेकून द्या, सतत काहीतरी नवीन, परंतु पर्यावरणावर याचा काय परिणाम होईल हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. पण आपल्या या वर्तनाची शिक्षा आपल्याबरोबरच पूर्ण सजीवाजीव सृष्टीला झाली आणि अजूनही भोगावी लागत आहे. म्हणून तिसरा महत्त्वाचा विचार हा असावा की आपण वापरलेल्या गोष्टींचा पुनर्वापर कसा करू शकतो? वापरुन झालेल्या गोष्टीचा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वेळेस वापर करण्याचा प्रयत्न करू.
Recycle (पुनःप्रक्रिया करू): जर वरील तीन गाळण्यांमधूनसुद्धा काहीतरी सुटलं आणि खरोखरच कोणताही पर्याय नसेल तर वापरून झाल्यावर ती गोष्ट फेकून देण्याची वेळ येईल तेव्हा ती फेकून देण्याऐवजी पुन:प्रक्रीया करण्यासाठी पाठविण्यास प्राधान्य देऊ.
वरील चार Rs चे अनुसरण करूया – आपल्या स्वतःलाच वाचविण्यासाठी!
व्हिडिओ श्रेय: Ashish kapoor
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.