विचार शाश्वततेचा
वडाचे झाड (संस्कृतमध्ये वट किंवा न्यग्रोध) हे निसर्गाची शाश्वतता आणि चक्रीयतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. याला येणाऱ्या पारंब्या जमिनीवर पोहोचतात आणि ‘आधारस्तंभ मुळे’ किंवा ‘सहाय्यक खोडां’मध्ये परिवर्तित होतात आणि शेवटी ही एक सतत विस्तारणारी परिसंस्था बनते. संस्कृत मध्ये ‘वट’ म्हणजे घेरणे किंवा पसरणे. पारंब्यांना पसरवत जाऊन विशाल क्षेत्र व्यापण्याची क्षमता असलेला.
जवळून पाहिले तर हे सहज समजेल की हे झाड स्वतःच एक परिसंस्था आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सजीव गोष्टींचे ते घर आहे. म्हणूनच याला ‘जीवनवृक्ष’ असेही म्हणतात. हा वृक्ष दिवसा आणि रात्री देखील प्राणवायू (ऑक्सिजन) उत्सर्जित करतो.
वटवृक्षाच्या या परिसंस्थेत तेथील सर्व सजीव गोष्टी एकत्र नांदतात. सर्वजण सहजीवन व सहकार्य प्रस्थापीत करतात आणि या छोट्याशा परिसंस्थेला शाश्वत बनवितात
त्याचप्रमाणे, नैसर्गिक वातावरणात, प्रत्येक ठिकाणी आपण पाहिले तर लक्षात येते की एक अंतर्निहित चक्रीयता आहे, सतत देणे आणि घेण्याची यंत्रणा, आंतर-अवलंबित्व, प्रत्येक सजीवांना समान महत्त्व, अत्यंत बदलत्या वातावरणात संतुलन साधण्याची दृढता, विघटन क्षमता, विविधता, विकेंद्रीकरण आणि मर्यादा आहे.
वरील मूलभूत वैशिष्ट्यांसह, निसर्ग मर्यादित स्त्रोतांसह अमर्याद उपलब्धता साध्य करतो.
उदाहरणार्थ, दिवसा झाडं कार्बन डाय ऑक्साईड हवेतून घेतात (जो की प्रत्यक्षात इतर सजीवांच्या उच्छवासातून निर्माण होतो) आणि ऑक्सिजन सोडतात. पृथ्वीवरील मर्यादित ऑक्सिजनचे निरंतर नूतनीकरण कसे होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. आणि अशाच प्रकारे या ग्रहावरील जीवन टिकते व शाश्वत बनते.
पृथ्वीवरील प्रत्येक सजीव प्राणी तसेच निर्जीव वस्तूंची सुद्धा काही ना काही भूमिका आहे. प्रत्येकाला एक विशिष्ट काम नेमून दिलेलं आहे. कोणतेही काम करणारा दुसरा बदली जीव उपलब्ध नाही किंवा असला तरी त्यांच्या बदलीची संधी फारच कमी असते आणि तीही कोणत्याही मोठ्या नुकसानी शिवाय नक्कीच नाही.
ज्याप्रकारे आपण पृथ्वीवरील संसाधने आणि इतर सजीव, निर्जीव वस्तूंचे शोषण करीत आहोत, त्यामुळे ते वेगाने कमी होत आहेत आणि लवकरच ते नष्ट होतील.
आपल्याला अपेक्षीत रेखीय वाढ शाश्वत आहे की निसर्गाची कोट्यावधी वर्षांपासून सिद्ध झालेली चक्रीय वाढ शाश्वत आहे याचा प्रत्येकाने विचार करण्याची आता वेळ आहे.
वरील व्हिडिओ आम्ही काय सांगत आहोत याची फक्त एक झलक देतो. प्रत्येकाने तो पहावा, विचार करावा आणि ‘पुनर्विचार’ करावा.
व्हिडिओ श्रेय: NIST Institute: Safety Courses Provider
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.