महाराष्ट्र दिन
१ मे, आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी, १९६० मध्ये, महाराष्ट्र राज्य ब्रिटीश राजवटीच्या मुळात बॉम्बे स्टेट म्हणून ओळखल्या जाणार्या विभागापासुन तयार झाले.
७२० कि.मी. लांबीच्या किनारपट्टीने (कोकण) आणि दख्खनच्या पठाराने महाराष्ट्र राज्य सुशोभित केलेले आहे. दख्खनचे पठार आणि कोकण किनारपट्टी यांना “सह्याद्री” नावाच्या विशाल पर्वतरांगांनी विभक्त केले आहे.
येथे मराठी ही मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा आहे त्यामुळे मराठीत लिहिलेलेच काहीतरी या राज्याचे यथार्थ वर्णन करू शकेल. लोकप्रिय कवी गोविंदाग्रज यांच्या ‘मंगल देशा! पवित्र देशा!’ कवितेतील काही कडवी खाली देत आहोत.
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
ठायीं ठायीं पांडवलेणी सहयाद्रीपोटीं
किल्लें सत्तावीस बांधिले सहयाद्रीपाठीं
तोरणगडचा, प्रतापगडचा, पन्हाळगडचाही
सिंधुदुर्ग हा, विजयदुर्ग हा, ही अंजनवेल
दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल
ध्येय जे तुझ्या अंतरी..
– कवी गोविंदाग्रज
सह्याद्री पर्वत गोदावरी, कृष्णा, भीमा – यांसारख्या अनेक ‘जीवनवाहिनी’ नद्यांचा उगम आहे. यास “स्वातंत्र्यआत्मा सहयाद्री” असेही म्हणतात. आजतो ३५० पेक्षा जास्त किल्ले अंगावर घेऊन दिमाखात उभा आहे. ह्याच सहयाद्रीच्या व त्यावरील किल्ल्यांच्या आशिर्वादाने १७ व्या शतकातील महान राजा शिवाजी व त्यांचे मावळे शेवटच्या श्वासापर्यंत अनेक परकीय हल्ल्यांविरूद्ध व जुलमी पातशाह्यांविरुद्ध लढले आणि त्यांनी ‘स्वराज्य’ स्थापन केले.
सह्याद्रीचे महत्त्व श्री. स.आ.जोगळेकर यांच्या “सह्याद्री स्तोत्र” या प्रसिद्ध कवितेत अधोरेखीत झाले आहे.
सह्याद्री नामा नग हा प्रचंड,
हा दक्षिणेचा अभिमान दंड l
ज्वालामुखींनी जरी निर्मियेला,
पवित्र तो रामपदे जहाला ॥
शिरावरी शंभू विराजताहे,
कन्याकुमारी पद धूत आहे l
स्वंधांवरी दुर्गम दुर्ग ज्याच्या,
हाती झळाळे परशू तयाच्या ॥
उन्मत्त-निर्दालन-दक्ष राही,
निर्वासितां आश्रयलाभ देई l
ही पुण्यभूमी तशी त्यागभूमी,
स्वातंत्र्यभूमी तशी कर्मभूमी ॥
आधार, आदर्श हि भारताला,
प्रसाद त्याचाच आम्हां मिळाला l
झेंडा तयाचा भगवा विराजे,
तयापुढें मस्तक नम्र माझें ॥
– श्री. स. आ. जोगळेकर
जैवविविधता
सह्याद्री पर्वतरांग आणि उर्वरित महाराष्ट्र जैवविविधतेने नटलेला आहे. पश्चिम घाट म्हणून ओळखला जाणारा सह्याद्रीचा भाग हा जगातील, विविध प्रकारच्या जीवांचे माहेरघर म्हणून, पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांपैकी एक आहे. देवराईसारख्या परंपरा आणि श्रद्धांनी या प्रदेशात राहणाऱ्या लोकांनी येथीलजैवविविधतेचे रक्षण केले आहे.
वरील फोटो गॅलरीमध्ये आम्ही सर्वांना महाराष्ट्राच्या काही वैशिष्ट्यांशी परिचित करत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज – कोणत्याही शब्दांत त्यांचे वर्णन होऊ शकत नाही. ते आपल्या देशाच्या क्षितिजावरील “शिवसूर्य” आहेत. ते वर्षानुवर्षे आशेचा प्रकाश देत राहतील.
रायगड किल्ला हा सर्व किल्ल्यांचा राजा आहे. ही स्वराज्याची राजधानी होती. शिवाजी महाराज या किल्ल्यावर गेले असता गडाचे कौतुक करताना काय म्हणाले होते याचे वर्णन सभासद बखरीमध्ये आहे.”राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.”
तामण हे आपले राज्यफूल आहे, आंबा हा आपला राज्यवृक्ष आहे, ब्लू मॉर्मन (राणी पाकोळी) हे आपले राज्यफुलपाखरू आहे आणि शेकरू हा आपला राज्यप्राणी आहे.