Email: [email protected]    Website Language: English / मराठी

पावसाळ्यातील भटकंतीची तयारी - लॉकडाऊन नंतरची

आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे काही 'शहाणीव' व 'सामंजस्य' आपल्याबरोबर घेऊन जाऊ...
01
Jun

पावसाळ्यातील भटकंतीची तयारी – लॉकडाऊन नंतरची

चक्रीवादळं अधिक तीव्र आणि विध्वंसक बनत आहेत, कोविड-१९ अद्यापही सुरू आहे आणि यामुळे लॉकडाऊन वाढत आहे. आपण सर्व कठोर परिस्थितीतून, कठीण टप्प्यातून, तणावातून आणि दु: खातून गेलो आहोत, जात आहोत. ‘यापेक्षाही वाईट काय असू शकते!’ ही भावना सर्वत्र आहे. प्रत्येकालाच यातून बाहेर यायचे आहे.

लवकरच गोष्टी सौम्य होतील, सामान्य होतील, लॉकडाऊन संपतील. याचा परिणाम म्हणजे, सर्वप्रथम कोणती गोष्ट होईल तर ती म्हणजे प्रत्येकाला कुठेतरी बाहेर जाण्याची तीव्र इच्छा होईल – निसर्गाच्या जवळ, जंगलात, किल्ल्यांवर. का? तर पावसाळा आला आहे, प्रत्येकाला बदल हवा आहे, प्रत्येकजण आता शांतता आणि आनंदाचा शोध घेत आहे.

जरी आम्ही याबद्दल आठवण करून दिली नसती, तरी हीच पहिली गोष्ट आहे जी घडणार आहे – नक्कीच.

या लेखाचे उद्दीष्ट हे सांगण्याचे आहे की यासाठी तयारी कशी करावी. मग हा लेख फिरायला जाण्याची ठिकाणे कशी निवडाल याबद्दल चर्चा करणार आहे का? की आपल्या पिशव्या कशा पॅक करायच्या ? की काय बरोबर न्यायचे आणि काय नाही? की स्वतःची काळजी कशी घ्यायची? यांबद्दल?

नाही! या लेखाचे उदिष्ट वेगळे आहे. लॉकडाऊन कालावधी दरम्यान आपण काय पहात आहोत याविषयी स्वत:लाच आठवण करून देणे हे आहे. कोणते बदल आपण पहात आहोत? आपण आपल्या वागण्यात कोणते बदल करायला हवेत?

कदाचित गेल्या काही दशकांच्या तुलनेत निसर्गाचा विकास पूर्वी कधी झाला नव्हता इतका आज दिसत आहे. प्राणी, पक्षी आणि कीटक मुक्तपणे भटकत आहेत. शहराच्या भागातही पक्षांचे स्वर स्पष्टपणे ऐकू येत आहेत. जे पक्षी दिसणे ही दुर्मिळ बाब होती ते बाल्कनीमध्ये (सज्जा), छप्परांवर दिसत आहेत. वायू प्रदूषण इतके कमी आहे की शेकडो किलोमीटरवरील बर्फाच्छादीत पर्वत दिसू लागले आहेत. ध्वनी प्रदूषणाची पातळी अत्यंत खाली आली आहे.

गंगेसारख्या ‘पवित्र’ नद्या पहिल्यांदा स्वच्छ आणि कमी प्रदूषित दिसत आहेत. प्लास्टिक, कचरा यामुळे दरवर्षी सामान्यत: प्रदूषित होणार्‍या भागांनी प्रथमच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

आपण सर्वांनी दृकश्राव्य माध्यमे, प्रकाशचित्रे यांच्या स्वरूपात पुरावे पाहिले आणि त्यांचे आपल्याला आश्चर्यही वाटले. पण हे कसे घडले? हे झाले कारण बर्‍याच काळापासून कोणतीही मानवी वर्दळ किंवा कोणताही मानवी हस्तक्षेप इथे झाला नाहीये!

कोणीतरी योग्यच म्हटले आहे की, “आपल्यावर काहीतरी संकट येणार आहे हे आपण कधीही स्वीकारत नाही तोपर्यंत जोपर्यंत ते येत नाही”. चक्रीवादळांकडून, कोविड -१९ पासुन व निसर्गातील बदलांमधून काही महत्त्वाच्या गोष्टी आपण शिकूया – आपण पृथ्वीवरील एकमेव प्रजाति नाही, पृथ्वीवरील व्हीआयपी प्रजाति तर नाहीच नाही. जेव्हा आपण घरात लॉक झालो आहोत, तेव्हा निसर्गाची सर्व चक्रं अधिक कार्यक्षम झालेली दिसत आहेत आणि त्यांनी प्रभावीपणे पुन्हा कार्य सुरू केले आहे. या ग्रहावरील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूची निसर्गाच्या चक्रात भूमिका आहे. पण आपण ही वस्तुस्थिती विसरलो आहोत. जेव्हा आपण अनियंत्रितपणे, बेजबाबदारपणे वागतो तेव्हा आपल्यामुळे होणारी निसर्गाची हानी आणि असंतुलन वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यावर चक्रीवादळे, रोग आणि इतर आपत्तींच्या स्वरूपात उलटत आहेत.

आता आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत?

या लेखामधील प्रकाशचित्र, एका प्रसन्न, पवित्र जंगलाकडे जाणारी एक सुंदर वाट दर्शवित आहे. आगामी काळात जेव्हा आपण अशा वाटांवर चालत जाऊ, जेव्हा आपण अशा जंगलांत प्रवेश करू, तेव्हा त्या वाटा, ती जंगले आधि होती तितकीच व तशीच सुंदर ठेऊन बाहेर पडण्याचा कमीत कमी एवढातारी प्रयत्न आपल्या सर्वांना करता येईल का?

संपूर्ण जंगल आणि त्यातील जिवंत आणि निर्जीव वस्तूंना आपलं अस्तित्व ठायीठायी जाणवू देण्यापेक्षा आपण त्यांचं अस्तित्व अनुभवायला, त्याचा आदर करायला शिकू शकतो का?

निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, निसर्गाचा भाग होण्यासाठी, त्यात बेमालूमपणे मिसळून जाण्यासाठी काही सूचनावजा युक्त्या येथे देत आहोत.

  • आपण स्थानाशी परिचित होऊया: ते ठिकाण, तेथील निसर्ग, वनस्पति आणि प्राणीविश्व समजू घेऊया, अनुभवूया, आनंद घेऊया.
  • आपण प्रत्येक पावलाला जागृत राहू: पावसाळा प्रत्येक जीवजंतूंसाठी वेगवेगळ्या गतिविधींचा हंगाम असतो – घरे-घरटी बांधण्यासाठी साहित्य गोळा करणे, त्यांच्या नव्याने जन्मलेल्या पिलांसाठी अन्न गोळा करणे आणि असे बरेच काही. आपल्या पायाखाली येणाऱ्या प्रत्येक जीवाला तुडवत निष्काळजीपणाने चालणार नाही एवढी काळजी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू.
  • झाडांना इजा होणार नाही याची काळजी घेऊ: केवळ आपल्या क्षणिक आनंदासाठी किंवा मी किती महान आहे हे एखाद्यास दाखवण्यासाठी आपण झाडे तोडू नयेत किंवा त्यांना इजा करु नये.
  • आपण फुले तोडणार नाही याची काळजी घेऊ: पुढची पिढी तयार करण्याचा निसर्गाचा मार्ग म्हणजे फुले. फक्त आपल्या विकृत आनंदासाठी त्यांना तोडू नये.
  • आपण प्राणी व किडे यांना खायला देऊ नये: प्राणी व किडे नैसर्गिकरित्या जगले पाहिजेत. त्यांना स्वत:च्या व त्यांच्या पिल्लांना त्यांच्या अधिवासात पुरेसे अन्न मिळते. काही मिनिटे किंवा काही तासांच्या आपल्या स्वतःच्या मनोरंजनासाठी त्यांना आपल्यावर अवलंबण्याची सवय करून त्यांचे आयुष्यभराचे नुकसान होऊ देऊ नये.
  • आपण प्राणी व कीटकांना त्रास देऊ नये: प्राणी व कीटकांना त्रास देणे आपल्यासाठी तसेच त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यांचा आदर करणे, त्यांच्या कृतीचा आणि वागण्याचा आदर करणे शिकूया.
  • स्पर्श करु नका परंतु केवळ निरीक्षण करा: आपण काहीतरी वेगळे पाहिले तर त्यास स्पर्श करु नका. सुरक्षित अंतरावरून पहा. स्पर्शामुळे एखादी नाजूक गोष्ट खराब होऊ शकते किंवा ती आपल्यासाठीही हानिकारक असू शकते.
  • ठिकाणे स्वच्छ ठेवायचे लक्षात ठेवू: कचरा टाकू नका, प्लास्टिक टाकू नका. जर आपण बेजबाबदार वागत राहिलो तर आनंद घेण्यासाठी, शांतता अनुभवण्यासाठी, सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि प्रशंसा करण्यासाठी लवकरच एकही ठिकाण शिल्लक राहणार नाही.
  • धूम्रपान करू नका: निसर्ग हे कार्बन डाय ऑक्साईड (कर्बवायु) आणि इतर विषारी वायू घेण्याचे स्थान नाही. आपली शहरे ते पुरवण्यासाठी सुसज्ज आहेत. निसर्ग हे शुद्ध प्राणवायू श्वसनाचे ठिकाण आहे, धूर नव्हे. प्राणवायू आपल्या जीवनासाठी, आपल्याला उत्साही आणि शांत ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
  • जे ऐकतात, त्यांच्यासाठी पृथ्वीवर कर्णमधुर संगीत आहे: चला आपण “शांतता ऐकायला” देखील शिकू या. ही गोष्ट अपार आनंद देते. किल्ल्यांवर चढताना, जंगलात फिरताना आपल्याला टेप-रेकॉर्डर, धनीवर्धक, म्युझिक प्लेयर यांची गरज का पडावी? जोरात ओरडत फिरणे आणि चालत असताना सतत गप्पा मारणे आपण टाळूया. निसर्गाकडे आपण दररोज ऐकतो त्यापेक्षा वेगळे आणि विपूल संगीत उपलब्ध आहे. त्याचा आनंद घेण्यास शिकू या.
  • आपली नावे लिहू नये: झाडांवर, खडकावर-दगडांवर नावे लिहिणे, त्या जागेला कुरूप बनवण्याव्यतिरिक्त काही करत नाही. जो नावे लिहितो त्याला निसर्गाकडून व इतर लोकांकडून अप्रत्यक्षपणे दूषणांव्यतिरिक्त काहीही मिळत नाही. तरीही, कोणीही जो असे करण्यास प्राधान्य देईल तो बहुधा ‘होमो सेपियन्स’ – शहाणा मानव या प्रजातित व श्रेणीत बसण्यायोग्य नसेल.
  • झाडे, पक्षी, प्राणी व किड्यांकडून काय शिकता येईल? शिस्त, आज्ञाधारकता, ऐक्य, स्वच्छता, शांतता, सहकार्य, नि:स्वार्थी वृत्ती.
  • काय करायचे नाही यापलीकडे आपण काही करू शकतो का? हो नक्कीच. आपण ज्या ठिकाणी भेट देण्याचा विचार करीत आहोत त्या ठिकाणी जाण्यापूर्वी तेथे नैसर्गिकरित्या कोणत्या प्रकारच्या वनस्पति वाढत होत्या/आहेत याचा शोध घेऊ. आपण केवळ स्थानिक झाडे / झुडुपे, औषधी वनस्पतिंच्या प्रजातिंचे अनुवांशिकरित्या सुधारित न केलेले बियाणे किंवा अशा वनस्पतिंची रोपं आपल्याबरोबर ठेवू शकतो. आपण स्वत: अभ्यास करू शकत नसल्यास, तज्ञांना विचारु शकतो, त्या भागात राहणाऱ्या स्थानिक लोकांकडून माहिती घेऊ शकतो. ज्या ठिकाणी जंगलतोड झाली आहे तेथे बिया टाकू. तेथे रोपे लावू. यासाठी स्थानिक लोकांची मदत घेऊ. चला निसर्गा विषयी काही जबाबदारी दाखवू.

आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे काही 'शहाणीव' व 'सामंजस्य' आपल्याबरोबर घेऊन जाऊ आणि परत येताना जीवनाचे ‘सार - मूलतत्व’ बरोबर आणू.

Share To:

1 Response

  1. संतोष उंबरे

    खूपच सुंदर लेख आहे. जंगलात फिरताना आपण काय करावं आणि काय करू नये हे फार मार्मिक शब्दांत सांगितले आहे, जे आपण सहज करू शकतो. गरज एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे निसर्गाविषयी आपली जागरूकता!

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...