योगसाधना, निसर्ग आणि मानवजात
‘योग’ म्हणजे काय? भारतीय संस्कृतीतील शरीराचा व्यायामप्रकार? दुर्दैवानं किंवा आजच्या काळातील अभ्यासातील मर्यादांमुळे फक्त आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळी आसने असलेला व्यायामप्रकार म्हणजे ‘योग’ अशीच व्याख्या रुढ होऊ पाहते आहे.
चला तर, आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने थोडासा वेळ काढून योग म्हणजे काय, ‘साधना’ म्हणजे काय, निसर्ग आणि योग, निसर्ग आणि ‘योगसाधना’ यांत काय संबंध आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
एक सोपा प्रश्न – आपण रोज जगतो ते आनंद मिळविण्यासाठी की दुःख मिळविण्यासाठी? ‘निसर्गायण’ या पुस्तकात श्री. दिलीप कुलकर्णी यांनी एक छान उदाहरण दिले आहे. “तुम्ही हसलात तर सारं जग तुमच्या बरोबर हसेल; रडलात तर मात्र एकटेच रडत बसाल!” दुःख कुणालाच नको असतं. सुख सर्वांनाच हवं असतं. त्यांच्याच शब्दांतील पुढील माहिती पाहूयात…
परिपूर्ण आणि शाश्वत आनंद
तर ह्या सुखाची, आनंदाची जाणीव आपल्याला कशातून होते? आपल्या पंचेन्द्रियांमार्फत – जीभ, डोळे, कान, नाक आणि त्वचा. यांना आपण ज्ञानेन्द्रिय असेही म्हणतो. या पाचही वेगवेगळ्या इन्द्रियांकरवी आपण आनंद उपभोगतो व अशी आनंद होण्याची कारणेही वेगवेगळी असतात. म्हणजेच आनंद होण्यासाठी विशिष्ठ कारण अथवा वस्तुच असावी असे नाही व विशिष्ठ इन्द्रिय असावे असेही नाही! मग इथे हे समजून घेणे महत्वाचे आहे की आनंद होतो म्हणजे नक्की काय? तर याचा अर्थ आपण देहभान विसरतो! मुक्तावस्थेचा परमोच्च अनुभव होतो. या स्थितीत पोहोचण्यासाठी घडलेली घटना व तीची जाणीव करून देणारे इन्द्रिय हे दोन्ही केवळ साधनं ठरतात. काठीच्या आधाराने उंच उडी (पोल वॉल्ट) मारताना काठीचा जो उपयोग तोच आनंदाच्या बाबतीत इन्द्रियांचा. परंतु उडी उंचीची मर्यादा गाठते न गाठते तोच त्या अवस्थेतून खाली यावं लागतं – वेगानं. आनंदाचही असच होतं. तो क्षणभरच होतो. त्यामुळे न संपणारा आनंद मिळावा अशी इच्छा असली तरी तो कसा मिळवावा हेच कळत नाही. इन्द्रिय आणि मन यांचं नियंत्रण कसं करावं हे पण कळत नाही.
मग आपल्याला कधीतरी ‘शाश्वत’ – न संपणारा आनंद मिळू शकणार नाही का? मिळेल! कसे ते पाहू. मूळात होतं काय की आनंदाच्या क्षणाचा प्रवास ज्ञानेन्द्रिय – मन – बुद्धि – (पुन्हा) मन – कर्मेन्द्रियं असा होतो. त्या क्षणाला आपलं मन पूर्णपणे शांत होतं. त्याबरोबर ज्ञानेन्द्रियं, कर्मेन्द्रियं आणि बुद्धि हे तीनही क्षणभर थांबतात. आपण मुक्तावस्थेचा परमोच्च आनंद घेतो. तर या स्थितीला म्हणतात ‘आत्मस्थिती’ अथवा ‘योगस्थिती’. याचाच अर्थ या ‘योगस्थितीला’ पोहोचण्यासाठीचं रहस्य काय तर – मन शांत करणं.
संपूर्ण भारतीय तत्वज्ञानाच्या केंद्रस्थानी, मन शांत करणं, स्थिर करणं, एकाग्र करणं ही गोष्ट आहे. कारण ही स्थितीच शाश्वत, अक्षय्य आनंद देऊ शकते. त्यानुसार उपभोगाशिवाय मन शांत करण्याची जी प्रक्रिया तिलाच ‘साधना’ म्हणतात व त्यासाठीचं जे शास्त्र आहे त्याला ‘योग’ असं नाव आहे. साधना वेगवेगळ्या प्रकारे करता येते पण त्या सर्व प्रकारांचे ध्येय, मन, त्याचं नियंत्रण, संयम व साम्यावस्था यांच्याशी जोडलेले आहे. थोडक्यात मन शांत करणं ही शाश्वत आनंदाची गुरुकिल्ली आहे.
निसर्ग आणि योग
आता निसर्ग आणि योग, निसर्ग आणि साधना, निसर्ग आणि मनःशांती, आत्मस्थिती यांच्यातील संबंधाबाबत विचार करू.वनाधिकारी आणि निसर्गलेखक (निसर्गऋषीच खरं तर) श्री. मारुती चितमपल्ली यांनी आपल्या ‘निसर्गवाचन’ या पुस्तकात याबद्दल खूप सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात…
ज्ञानेश्वरीचा सहावा अध्यायात सिद्धभूमीचे असे वर्णन आहे –
‘जेथे समाधान लाभावे म्हणून बसले असता जेथून हलूच नये असे वाटावे, जेथे संतसज्जनांची वसति असल्यामुळे आनंद वाढतो, ज्या स्थानाकडे वळले असता नास्तिकाच्या मनीदेखील तपश्चर्येची इच्छा होते, व जे स्थल इतके शुद्ध असते की जिथे ब्रम्हाचा (म्हणजेच वर उल्लेखलेल्या आत्मस्थितीचा) साक्षात्कार होऊ शकतो.’
निसर्गात, अभयारण्यात जाऊन राहिलेल्यांना अशा प्रकारचा अनुभव कमी-अधिक प्रमाणात आलेला असतोच.
जंगलातल्या वृक्षांचं, पक्ष्यांचं, कीटकसृष्टीचं, त्यांच्या जीवनक्रमाविषयीचं निरीक्षण करण्यात मारुती चितमपल्ली यांचे तासन् तास आनंदात निघून जात, हे त्यांना कळतही नसे. ध्यानधारणेसाठी शिस्त लागते व ती सहज घडावी लागते. ओढून-ताणून होत नाही. त्यांच्याबाबतीत ही क्रिया सहज होत असे. मन एकाग्र करण्याचे अनेक प्रकार योग साधनेत सांगितले आहेत. कोळी – कीटकांचं निरीक्षण, पक्षीनिरीक्षण, आकाश व वन्यप्राणी निरीक्षण, उगवत्या सूर्याचं व शुक्राच्या चांदणीचं निरीक्षण, यांच्या निमित्तानं मन एकाग्र करून आपण एक प्रकारची योगसाधनाच करतो.
माणूस आणि वन्यजीव
वन्य प्राणी हे सिद्ध जीव आहेत परंतु मानवाला योगक्रियेद्वारे प्रयत्नानं सिद्धी प्राप्त करुन घ्यावी लागते. प्राचीन ऋषीमुनींनी योगासने तयार केली ती मुळातच निसर्ग निरीक्षणातून, निसर्गाशी एकरूप होऊनच. म्हणूनच सुमारे नव्वद टक्के योगासनांची नावं व कृती ही पशुपक्ष्यांच्या नावांवरून व वर्तनावरून घेतली आहेत. सिंहमुद्रा, मयूरासन, हंसासन, क्रौंचासन, भुजंगासन, मकरासन, कूर्मासन, मत्स्यासन, शलभासन, इत्यादी. ही फक्त आसनांची नावं नाहीत, तर त्याबरोबर त्या त्या पशुपक्ष्यांच्या स्वाभाविक गुणधर्मांचाही त्यात विचार केलेला आहे. उदाहरणार्थ, सिंहमुद्रेमध्ये सिंहाच्या गर्जनेचं अनुकरण आहे. ज्यातून जीभ लवचीक बनते, घसा फाटण्याची प्रवृत्ती कमी होते. गायक, कालाकार, प्राध्यापक यांच्यासाठी फलदायी. मयुरासनाचा नित्य अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला कठीण पदार्थ पचविण्याची जठराची शक्ती प्राप्त होते.
या सर्व विवेचनातून काही महत्वाच्या गोष्टी अधोरेखीत होतात. केवळ योगासने म्हणजे योग नाही आणि योग म्हणजे फक्त शरीराचा व्यायाम नाही तर शरीर, मन, बुद्धी, इन्द्रियं यांचे पोषण व कायाकल्प आहे. निसर्ग आणि योग व त्यातून ‘योगसिद्धी’ यांचा असा अन्योन्य संबंध आहे. याचाच अर्थ निसर्गाविरुद्ध युद्ध पुकारून, निसर्गाचा ऱ्हास. विनाश करून आपण फार काळ आनंदी, सुदृढ राहू शकणार नाही.
मग यासाठी उठून दूर निसर्ग आणि सिद्धभूमीच्या शोधात जाण्यापेक्षा आपल्या सभोवतालीच पुन्हा निसर्ग आणि शांतता फुलवता येतील का ?
आत्मज्ञानासाठी ही पुस्तके जरूर वाचा: निसर्गायण, निसर्गवाचन