चिमण्यांच्या हरवलेल्या जगाच्या शोधात
आज पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जागरूक झालेले बरेच लोक, त्यांना पडलेल्या इतर अनेक प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी धडपडत आहेत, तो म्हणजे “अगदी काल-परवा पर्यंत मुबलक दिसणाऱ्या चिमण्या गेल्या तरी कुठे?”
या प्रश्नाचे उत्तर तितके सरळ नसले तरी आम्ही काही तथ्य इथे मांडू इच्छितो.
माणसांप्रमाणेच चिमण्यांच्या देखील पूर्वनिर्धारित मूलभूत गरजा आणि दिनक्रमातील गोष्टी ठरलेल्या असतात. त्यांनाही अन्नाची गरज आहे, त्यांनादेखील निवारा हवा आहे, त्यांच्या पिलांसाठी घरटे बांधण्यास सुरक्षित जागा देखील हवी आहे, ते बांधण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, पिण्यास व आंघोळीसाठी पाण्याची व धूलीस्नान करण्यासाठी त्यांना मातीचीही गरज आहे.
आम्ही काही गावांमध्ये, जेथे चिमण्या ‘अजूनही’ अस्तित्वात आहेत आणि शहरातील काही ठिकाणे असे छोटे अभ्यास दौरे केले. तेव्हा काढलेली खालील प्रकाशचित्रे चिमण्यांच्या मुख्य गरजा व त्यांची खरी परिस्थिती दर्शवितात आणि या लेखातील शब्द संख्या मर्यादीत ठेवण्यासही मदत करतात.

खेडेगावात...
खेडेगावांत चिमण्यांसाठी अजुनही थोडेफार अनुकूल वातावरण शिल्लक आहे.

घरटे
वापरले जाणारे साहित्य: गवत, काड्या, कापूस, सुतळ्या.
ठिकाणे: भिंतींमधील पोकळ्या, छप्पर आणि भिंत यांमधील फटी, भिंती आणि सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्या यामधील मोकळ्या जागा, वास्तुंच्या लाकडी वाशांच्या जोडांमधील पोकळ्या, इत्यादी.

आहार
त्यांचे नैसर्गिक अन्न म्हणजे विविध प्रकारची धान्यं, पिकांमधील अळ्या, इतर कीटक. पण, अगदी खेड्यांमध्ये देखील, रासायनिक कीटकनाशके आणि खतांचा वाढता वापर चिमण्यांना पूर्वी मिळणारे नैसर्गिक अन्न नष्ट करत आहे.

पाणी
पावलापावलावर उथळ पाणी आणि अन्न यांचे नैसर्गिक स्त्रोत त्यांना आवश्यकतेनुसार पाणी आणि अन्न ग्रहण करण्यास मदत करतात. त्या उथळ पाण्यात आंघोळीचाही आनंद घेतात.

थारा
निवाऱ्याची अथवा थाऱ्याची जागा याचा अर्थ दुपार आणि रात्रीच्या वेळी विश्रांतीची जागा हा आहे. चिमण्या वेगवेगळी दाट झुडुपे व बाभूळ (Acacia nilotica), बोर (Zyzyphus mauritiana), भोकर (Cordia dichotoma) अशी दाट झाडे पसंत करतात जी खेडेगावांत अजुनही आहेत. ते शिक्रासारख्या भक्षकांपासून त्यांचे संरक्षण करतात तसेच त्यांना तीव्र ऊन आणि उष्णतेपासून देखील संरक्षण देतात.

धूलीस्नान
धूलीस्नान किंवा मातीस्नान त्यांच्या रोजच्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहे. ते त्यांचे पंख तेलकट होण्यापासून वाचविते त्यामुळे त्यांना अधिक सहजपणे उडण्यास मदत होते. ते पिसवा आणि इतर परजीवी यांपासुन त्यांचे रक्षण करते. या प्रकीयेत मातीशी होणाऱ्या घर्षणामुळे, कोरडी त्वचा आणि अडकलेल्या इतर अनावश्यक गोष्टी देखील शरीरावरून आणि पंखांमधून काढून टाकण्यास मदत होते.

शहरामध्ये...
शहरांमध्ये चिमण्यांना वरील गोष्टी मिळवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. ती इथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत.

घरटे
आपल्या तथाकथित ‘पॉश’ शहरांमध्ये ‘बाह्य’स्वच्छतेच्या संकल्पनेमुळे, चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी आवश्यक साहित्य मिळत नाही. बांधकामांतील ‘सुधारणांमुळे’ त्यांना त्यांच्या घरट्यांसाठी जागा निवडण्यास कोणतीही पोकळी सापडत नाही. आपल्यापैकी काही लोक लाकडी घरटी बसवतात. हा जरी चांगला विचार असला तरी तो शाश्वत नाही. निसर्ग सतत विविध पर्याय उपलब्ध करत जातो. तो ज्या चक्रीय पद्धतीने चालतो त्या पद्धतीने आपण ही गोष्ट अविरत चालू ठेवू शकत नाही.

आहार
शहरांमध्ये, सहानुभूती आणि प्रेमापोटी, आपल्यापैकी काहीजण अशा फीडरचा वापर करून त्यांना अन्नधान्य पुरवण्याचा प्रयत्न करतात. हा पर्यायसुद्धा अनेक कारणांमुळे शाश्वत नाही – सुरुवातीला आपण फीडर नियमित भरण्याचा उत्साह दाखवतो, पण नंतर आपण दुर्लक्ष करतो. जरी काहींनी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू ठेवला तरी ते अनिश्चित काळासाठी अन्न पुरवठ्याची खात्री देऊ शकत नाहीत. हे फक्त निसर्गच करु शकतो. दुर्दैवाने आपण पुरवलेले अन्नधान्यसुद्धा वापरल्या गेलेल्या रासायनिक कीटकनाशके आणि खतांमुळे विषारीच असते. आपल्यापैकी काही जण भात, चपातीसारखे शिजवलेले अन्न पुरवण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा की असे अन्न ही त्यांची नैसर्गिक सवय नाही. त्यांच्या नवजात पिलांना सुरवंट, अळ्या आणि अशा इतर गुळगुळीत अन्नाची आवश्यकता असते कारण ते कठीण धान्य नाजूक चोचीने तोडू शकत नाहीत पण शहरांत ते दुरापस्त झाले आहे.

पाणी
त्यांना शहरांमध्ये कुठेही पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठी पाण्याचे नैसर्गिक स्रोत मिळत नाहीत. कृत्रिम जलस्रोत ठेवणे ही माणुसकी आहे, परंतु ती पाण्याने भरणे ही एक जबाबदारी आहे जी पाण्यासाठीची भांडी ठेवल्यानंतर काही दिवसांनी आपण विसरतो.

थारा
शहरांमध्ये, आपण कोणतीही झुडुपे, बोरी-बाभळी सारखी झाडे शिल्लक ठेवलेली नाहीत. निदान थोड्याथोड्या अंतरावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे जाण्यास मदत करणारी, दुपारी आणि रात्रीच्या वेळी विश्रांती घेण्यास मदत करणारी झाडेझुडुपे उपलब्ध नाहीत. आपल्याकडे आहेत फक्त धातूची कुंपणे आणि सिमेंटच्या भिंती ज्या त्यांच्यासाठी निरुपयोगी आहेत.

धूलीस्नान
शहरांमध्ये आपण प्रत्येक ठिकाण सिमेंट रस्ते, डांबरी रस्ते किंवा सिमेंट ब्लॉक्सने झाकले आहे त्यामुळे त्यांना धूलीस्नान करण्यासाठी कोणतीही जागा उपलब्ध नाही.
एकूणच, त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचा नाश – प्रदूषण, अतिक्रमण, अतिस्वच्छता, रासायनिक कीटकनाशके व खते यांमुळे होणारे विषारी अन्न, कुठेही पोकळ्या उपलब्ध नसलेली बांधकामे, वृक्षतोड, इत्यादी, हे शहरांमध्ये चिमण्यांची संख्या घटण्याचे मूळ कारण आहे. दीर्घकालीन शाश्वततेच्या अभावामुळे, फीडर आणि लाकडी घरटी अशा कृत्रिम उपायांनी चिमण्या वाचणार नाहीत तर त्यांच्यापुढील समस्या आणखी बिकट होतील.
आतापर्यंत पाहिल्याप्रमाणे, चिमण्यांचेही एक नैसर्गिक चक्र आहे जे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यांच्या जगण्यासाठी अशाश्वत कृत्रिम उपाय पुरविण्याऐवजी आपण स्वतः कमी स्वार्थी बनू शकू का? आणि त्यांच्यासाठी नैसर्गिक अधिवास शिल्लक ठेवू शकू का? याचा विचार करू. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण त्यांच्या अधिवासांची छोटी छोटी बेटे तयार करावीत, जसे की बागा आणि उद्याने तयार करणे आणि मग चिमण्याच्या आगमनाची निष्फळ वाट पहाणे.
खरंतर आपली जीवनशैलीच अशा प्रकारची पाहिजे की चिमण्या आपल्या आजूबाजूला रहाणे पसंत करतील. त्यांचे नैसर्गिक अधिवास सिमेंट-काँक्रीटच्या जंगलांमध्ये छोट्या छोट्या स्वरूपात संकुचीत असण्यापेक्षा आपलीच घरे नैसर्गिक अधिवासाच्या आत असतील तर?
संबंधित: चिमण्यांचा अभ्यास
प्रिय वनारंभ,
लेख आणि माहिती खूपच सोप्या आणि सरळ भाषेत मांडली आहे. आवडले. तुमच्या कार्याला शुभेच्छा.
चैतन्य राजर्षी
सचिव – ALIVE
कौतुकाबद्दल धन्यवाद चैतन्य. विविध लघुलेख जास्तीत जास्त लोकांसोबत विशेषत: मुलांसोबत शेअर करा आणि त्यांना जागरूक होण्यात मदत करा.