Email: [email protected]    Website Language: English / मराठी

आकाशदर्शनाचा छंद म्हणजे काय?

ताऱ्यांकडे फक्त तेजस्वी ठिपके म्हणून पाहू नका. विश्वाची विशालता जाणण्याचा प्रयत्न करा. आकाशदर्शन आपल्याला निसर्गातील आपले नगण्यत्व शिकवते.
01
Dec

आकाशदर्शनाचा छंद म्हणजे काय?

आकाशदर्शनाचा छंद म्हणजे काय?

रात्रीच्या निरभ्र आकाशाकडे उघड्या डोळ्यांनी पाहात हजारो चमचमणाऱ्या चांदण्यांचे निरीक्षण करण्याचा छंद म्हणजे आकाशदर्शनाचा छंद.

थोडे इतिहासात, प्राचीन काळात डोकाविल्यास हे लक्षात येते की आपल्या पूर्वजांनी आकाशस्थ गोष्टींशी मैत्री केलेली होती. सततच्या निरीक्षणामुळे त्यांना ग्रहगोलांच्या हालचाली समजत होत्या. वर्षानुवर्षांच्या निरीक्षणातून त्यांनी अनेक अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढले होते. तसेच त्यांनी चंद्र-सूर्याच्या मार्गावरील त्यांच्या समूहांना काही नावे दिली होती, त्यांनाच नक्षत्रे व राशी म्हणतात. ते त्यांची दिनचर्या, शेतीभातीची कामे, सणसुद, ग्रहगोल कुठल्या नक्षत्रात आहेत, नक्षत्र आकाशात कुठल्या स्थानावर दिसत आहेत हे पाहून करीत असत कारण त्यांतून त्यांना दिशांचे, वेळेचे व ऋतूंचे ज्ञान झालेले होते. एवढेच नव्हे तर पूर्वीच्या काळातील व्यापार – जहाज प्रवास, जमिनीवरील प्रवास, रात्रीच्या आकाशाच्या आधारानेच चालत असे. पक्षी, प्राणी स्थलांतर करताना आकाशाचा उपयोग करतात हे निरीक्षणाअंती पूर्वजांना ठावूक होते.

आजकाल मात्र फक्त दिवसाच नाही तर रात्रीच्या वेळीसुद्धा आपली मान वर आकाशाकडे न वळता खाली मोबाईलकडे झुकलेली असते. उघड्या गच्चीवर किंवा अंगणात झोपल्यावर सुद्धा आपण एका कुशीवर वळून मोबाईल पाहात डोळ्यांचे त्रास वाढविणारे विज्ञान आत्मसात करीत असतो. त्यामुळे चुकून आकाशाकडे नजर गेलीच तर चांदण्यांनी भरगच्च असलेले आकाश नवीनच वाटते. त्यामुळे रात्रीचे आकाश एक पूर्णपणे अनाकलनीय व समजण्यास अवघड गोष्ट आहे असे वाटून आपण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. आज आपण मनोरंजन, इन्फोटेनमेंट आणि टाइमपाससाठी अनेक पर्यायांनी सुसज्ज आहोत आणि त्या पर्यायांत आपण आकंठ बुडालो आहोत.

मग सर्व आधुनिक भौतिक सुखसुविधा आज उपलब्ध असताना आपण आकाशदर्शन का करायचे?

वरील प्रश्नाचे उत्तर आपण पाहूच पण स्वतःलाच आणखी एक प्रश्न विचारू – आधुनिक भौतिक सुखसुविधा, भरपूर पैसा असुन सुद्धा आपण समाधानी, शांत, आनंदी व तणावविरहीत आहोत का? ज्यांचे या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे येईल त्यांनी पुढे नक्की वाचावे…

‘छंद आकाशदर्शनाचा’ या पुस्तकात डॉ. प्रकाश तुपे यांनी प्रस्तावनेतच आकाशदर्शनाचे महत्व खुप समर्पकपणे अधोरेखीत केले आहे.

अनोळखी गावी किंवा जंगलात रात्री राहिल्यास एकटेपणाची जाणीव आपल्याला होते. मात्र आकाशाकडे नजर टाकल्यास व आपल्याला ग्रह-ताऱ्यांची ओळख असल्यास एकटेपणाची जाणीव नाहीशी होते. आपल्या घरुन पाहिलेले ग्रह-तारे परक्या ठिकाणी मित्र भेटल्याची जाणीव करून देतात. त्यांच्याकडे पाहताना, त्यांच्या हालचाली, रंग, आकार यांचे निरीक्षण करताना विश्वाच्या विशालतेची जाणीव होऊ लागते व आपला एकटेपणा क्षणभरात नाहीसा होतो. आपला अहंकार, ‘मी’पणा निघून जातो व आपण खऱ्या अर्थाने ‘जमिनीवर’ येतो. माणसात विनम्रता आणायची असेल तर देवदर्शनापाठोपाठ आकाशदर्शनालाही महत्व आहे.

आकाशदर्शनामुळे आपापसातले वैर, झगडे, हेवेदावे व क्षुद्र विचार आपाल्यापासुन दूर जातात. मनाला शांतता लाभते. ‘वसुधैव कुंटुबकम्’ आणि ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या वृत्ती आपल्याला जाणवू लागतात. आपल्या मनावरील ताण नाहीसा होऊन आनंद, शांतता आणि समाधान यांचा लाभ आपल्याला सहज होतो.

जे लोक ट्रेकींगला जातात त्यांना या गोष्टीचा अनुभव असेल की डोंगर-दऱ्यांमध्ये, जंगलात, अनोळखी ठिकाणी रात्री हमखास दिशांचा गोंधळ उडतो. दिवसा पाहून ठेवलेल्या खाणाखुणा वेगळ्याच दिसू लागतात किंवा अंधारात नाहीशा होतात. अशा वेळी आकाशातील चांदण्या दिशा दाखविण्यास उपयोगी ठरतात, आकाशातील त्यांची जागा वेळेचा अंदाज देते. हे कसब अशा वेळी फार उपयोगी पडते.

सरतेशेवटी, संपूर्ण भारतीय तत्वज्ञानाच्या केंद्रस्थानी, मन शांत करणं, स्थिर करणं, एकाग्र करणं ही गोष्ट आहे. कारण ही स्थितीच शाश्वत, अक्षय्य आनंद देऊ शकते. आकाशदर्शनाचा छंद हा या स्थितीला जाण्याच्या मार्गांपैकी एक उत्तम मार्ग आहे!

फोटो क्रेडिट: अतुल निंबाळकर 

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...