भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग १
माता भूमि पुत्रोSहं पृथिव्या: | अर्थात, ‘पृथ्वी माझी आई आहे आणि मी तिचे मूल आहे’ असे अथर्ववेदातील १२.१.१२ वे सूक्त पृथ्वीसंबंधी सांगते. जोपर्यंत पृथ्वी पर्वत, जंगले आणि झाडे सांभाळण्यास सक्षम आहे, तोपर्यंत मानवजाती आणि त्यांची संतती टिकू शकेल असे ‘दुर्गा सप्तशती’ मध्ये म्हटले आहे.
भारतीय सणांसह भारतीय संस्कृतीचा प्रत्येक पैलू निसर्ग, पर्यावरण आणि शास्त्रीय पर्यावरण व्यवस्थापनाशी घनिष्ठपणे जोडलेला आहे. निसर्ग हा मित्र आहे, आई म्हणून पूज्य आहे, वडील म्हणून आज्ञा पालन करण्यायोग्य आहे आणि प्रिय मुलाप्रमाणे पालनपोषण करावा असा मानला आहे.
वैदिक साहित्यात, सर्व निसर्ग, एक प्रकारे दैवी मानला गेला असून तो मानव, प्राणी आणि वनस्पतींच्या जगाला एकत्र करणाऱ्या अविभाज्य जीवन शक्तीचा भाग होता. वैदिक लोक निसर्गाशी एकरूप होते. ‘एक-तत्व जे सर्वांमध्ये प्रकट होते’ याचा अर्थ सर्वकाही इतर सर्वांशी संबंधित आहे. पाच हजार वर्षांपूर्वी, ऋग्वेदातील ऋषींनी निसर्ग आणि पर्यावरण, पर्यावरणाचे महत्त्व आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन (१.११५, ७.९९ आणि १०.१२५) यांची स्पष्ट प्रशंसा केली आहे. ऋग्वेद एक संपूर्ण सुक्त (‘नादिस्तुती सुक्त’) नद्यांना समर्पित करतो, तर अथर्ववेदातील पृथ्वीचे सुक्त (‘पृथ्वी सुक्त’, पुस्तक १२) मध्ये पृथ्वी आणि निसर्गाच्या स्तुतीसाठी आणि पृथ्वीवरील मानवी अवलंबित्व स्पष्ट करण्यासाठी त्रेसष्ट श्लोक आहेत. आपल्याला सर्व वेदांमध्ये, ‘जीवना’बद्दल सखोल आदर व्यक्त केलेला आढळतो.
अथर्ववेदातील एक अवतरण जीवनाच्या सर्व प्रकारांचे वर्णन करते. बर्फाने झाकलेले टेकड्या आणि पर्वत, घनदाट जंगले आणि पृथ्वी हे सर्व पवित्र आहेत. ते सर्व सजीवांच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करते. ते पुढे भरपूर पिकांची आस धरते. सर्व जमाती आणि राष्ट्रांची उन्नती होवो आणि कोणीही तुझ्या क्रोधाला किंवा नैसर्गिक आपत्तींना बळी न पडो (१२.१.१०). अथर्ववेदातील आणखी एका श्लोकात आपल्याला मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंधांचे सुंदर वर्णन सापडते: पृथ्वी, जिच्यावर महासागर, नद्या आणि पाण्याचे इतर स्त्रोत आहेत आणि जी आपल्याला अन्नधान्य निर्माण करण्यासाठी जमीन देते आणि जिच्यावर मनुष्यप्राणी जगण्यासाठी अवलंबून आहे – ती आपल्या खाण्यापिण्याच्या सर्व गरजा: पाणी, दूध, धान्य आणि फळे, पूर्ण करो’ (१२.१.३).
माणसांचा प्राण्यांवर अधिकार नाही. उलट, त्यांची सर्व सृष्टीप्रती कर्तव्ये आणि ऋण आहेत. हिंदू तत्त्वज्ञान, काय करा आणि काय करू नका हे सांगत बसत नाही, देव निवाडा करायला बसत नाही. कार्यकारणभाव – वर्तन आणि परिणाम: ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या वर्तनाचे, चांगले किंवा वाईट परिणाम भोगावे लागतात. देव दयाळू आणि प्रेमळ आहे, निवाडा करणारा नाही. लोक त्यांच्या वर्तनासाठी स्वतः जबाबदार असतात आणि एखाद्याचे कर्म किंवा कृती यांचे परिणाम त्याच्या भविष्यातील जीवनात पडसाद म्हणून उमटतात. हिंदू तत्त्वज्ञानात पर्यावरणीय नीतिशास्त्राची एक निश्चित संहिता आहे. त्यानुसार, मानव स्वतःला निसर्गापेक्षा वरचढ मानू शकत नाही किंवा जीवनाच्या इतर प्रकारांवर राज्य करण्याचा दावा करू शकत नाही. त्यामुळे परंपरेने हिंदूंचा दृष्टिकोन निसर्गाप्रती आदरयुक्त राहिला आहे. निसर्गाच्या सर्व प्रकारांबद्दलचा आदर आणि पृथ्वीच्या पर्यावरणामध्ये प्रत्येक जीव निभावत असलेल्या अद्वितीय भूमिकेच्या अस्तित्वाच्या मान्यतेबद्दल हिंदू तत्वज्ञान प्रख्यात आहे. कारण त्यात मानवकेंद्रीत नाही तर’ वैश्विक दृष्टिकोन आहे.
निसर्गाचा प्रत्येक पैलू भारतीय धर्मांसाठी पवित्र आहे: जंगले आणि देवराया, बागा, नद्या आणि इतर जलस्रोत, वनस्पती आणि बिया, प्राणी, पर्वत आणि तीर्थक्षेत्रे. आधुनिक भारतात लोकांच्या जीवनातील काही पैलूंमध्ये, ग्रामीण भागात, विशेषत: बिश्नोई सारख्या समुदायांमध्ये आणि अनेक जमातींमध्ये अनेक प्रकारे निसर्ग आणि पर्यावरण यांना साजरे करणाऱ्या अनेक सणांमध्ये हे पावित्र्य अजूनही दिसून येते.
सर्वेSत्र सुखिनः संतु सर्वे संतु निरामया । सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखमाप्नुयात ।। - बृहदारण्यक उपनिषद, १.४.१४ अर्थ: सर्व लोक सुखी व निरामय (व्याधि-रोगमुक्त) होवोत; सर्वांचे कल्याण व्हावे कोणीही दुःखी असू नये.
संदर्भ: नंदिथा कृष्णा लिखित Hinduism and Nature या पुस्तकातील काही उल्लेखांचा सहज अनुवाद
चित्र स्रोत: India Today
हे पुस्तक वाचलेच पाहिजे: