Email: [email protected]    Website Language: English / मराठी

भारतीय संस्कृती आणि निसर्ग - भाग २

पृथ्वी ही सृष्टीची रक्षक आहे, जंगले, झाडे आणि वनौषधींची धारक आहे
05
Jun

भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग २

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने

शेजारील प्रकाशचित्रात ‘गजलक्ष्मी’ चे शिल्प दिसते आहे. यात ती कमळावर बसलेली आहे. कमळ पाण्यात असूनही अलिप्त असते. त्याच्या पानावर पडलेले पाणीसुद्धा घरंगळून जाते. जीवन हे क्षणभंगुर आहे हे जरी खरे असले तरी त्यातील प्रत्येक क्षण सौंदर्याने भरलेला आहे त्याचेच हे निदर्शक आहे. जीवनाचे प्राथमिक प्रतिक म्हणजे जल. त्यातून प्रकटणारे सदाबहार जीवनाचे प्रतिक म्हणजे कमळ, जन्मदात्री, नवजीवन देणारी, पुनर्निर्माण करणारी माताच असू शकते म्हणून निसर्गदेवता ही सौष्ठवपूर्ण स्त्री रूपानेच समर्पकपणे दाखवता येते. हे शिल्प तसेच आहे. निर्मितीचा आनंद जणु शिशुला स्तनपान करतांना होणाऱ्या समाधानासारखा तिच्या चेहऱ्यावर आहे.

गजलक्ष्मीच्या दोन्ही बाजूला दोन-दोन हत्ती जलाने कलश भरताना कोरले आहेत. पाणी भरताना कळशी पाण्यात बुडवून थोडी हाताने पाण्याखाली दाबावी लागते हे कलाकाराच्या सूक्ष्म निरीक्षणात होते म्हणून हत्तीलाही पायाने कळशी पाण्याखाली दाबताना दाखवायचे तो विसरला नाही. त्या हत्तीच्या थोड्या वरच्या अंगास आणखी दोन हत्ती आहेत ते भरलेले जलकुंभ घेऊन त्याचा लक्ष्मीवर अभिषेक करत आहेत. येथे हत्ती हे मेघाचे प्रतिक तर अभिषेक म्हणजे पर्जन्य. बहरुन येणारी सृष्टी म्हणजे लक्ष्मी. हे चक्र अव्याहतपणे, सतत चालू आहे हे सूचित करण्यासाठी हत्तींच्या पाठीवरील झुलीतून लटकणाऱ्या घंटा हिंदोळ्याने मागे गेलेल्या कोरल्या आहेत.

लक्ष्मी ही केवळ धनसंपदा, रुपये, पैसे इतकी संकुचित कल्पना आपली नाही. परिपूर्ण असे निसर्गाचे वैभव, त्यातून निर्माण होणारी संपत्ती. मानव तर निसर्गाची सर्वात सुंदर निर्मिती. त्या मानवी रूपाची सौष्ठवयुक्त अशी ही प्रतिकृती. येथे ती केवळ सुंदर स्त्री म्हणून नव्हे तर एका मातेच्या रूपात. मातृत्वाशिवाय स्त्री जीवनाची परिपूर्णता नाही ही मूळ संकल्पना. सृष्टीची समृद्धी हीच धनसंपदा; सर्व मानवांसाठी अशी जगन्माता म्हणजे लक्ष्मी! या शिल्पाला ‘अभिषेक लक्ष्मी’ असे म्हणतात. – माहिती स्रोत: कै. श्री. उदयन इंदूरकर

माणसाच्या जीवनशैलीत निसर्ग कसा खोलवर रुजवलेला होता याचे हे शिल्प एक उत्तम उदाहरण.

यापुढे पाहूया नंदिथा कृष्णा लिखित Hinduism and Nature या पुस्तकातून आपल्याला भारतीय संस्कृती आणि निसर्ग याबद्दल काय काय शिकायला मिळते याची छोटीशी झलक…

महान वैद्यक शास्त्रज्ञ चरक यांनी ‘हवामानाच्या प्रदुषणामुळे अनेक प्रकारचे रोग उद्‌भवतील आणि देशाचा नाश करतील’, असे भाकीत वर्तवले होते. म्हणून, ‘भयंकर रोग सुरू होण्यापूर्वी आणि पृथ्वीच्या निसर्गस्वरूपात बदल होण्यापूर्वी औषधी वनस्पती गोळा करा’, हे सांगून ठेवले होते (चरक संहिता, ‘विमानस्थानम्’, ३.२). आधुनिक वैद्यकशास्त्राच्या आगमनाने चरक विस्मृतीत गेले.

‘प्रदूषणामुळे माणसाला दोन प्रकारचे आजार होतात. पहिला शरीराशी आणि दुसरा मनाशी संबंधित आहे आणि दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. . . कफ (शीतलता), पित्त (उबदारपणा, अग्नी) आणि वात (वायु) – हे शरीराचे तीन गुण आहेत. जेव्हा ते शरीरात संतुलित असतात तेव्हा ते रोगापासून मुक्त राहते’ (महाभारत, XIII. १६.८११).

प्राचीन हिंदू ग्रंथ, वन्य आणि लागवड केलेल्या वनस्पतींसह निसर्गाचा नाश करण्यास परावृत्त करतात. वनस्पतींचा नाश होऊ नये यासाठी ऋषी आणि संन्यासी यांनी फळे आणि सुका मेवा (सुकी फळे) यांवर जगणे अपेक्षित होते. वेदांमध्ये सर्वत्र आपल्याला जीवनाबद्दल सखोल आदर पाहायला मिळतो. ऋग्वेदातील ‘औषधी सूक्त’, वनस्पती आणि भाज्यांचा उल्लेख ‘हे माते ! शेकडो तुझी जन्मस्थळे आहेत आणि हजारो तुझे अंकुर आहेत’ (X.९७.२) अश्या प्रकारे करते. अथर्ववेदात काही औषधी वनस्पतींच्या नावांचा त्यांच्या मूल्यांसह अथवा उपयोगांसह उल्लेख आहे. प्रत्येक औषधी वनस्पती ही पृथ्वीवर जन्मलेली देवी आहे (VI.१३६). पुढे हीच माहिती आयुर्वेदासाठी महत्त्वाची सामग्री बनली. ऋग्वेद अगदी स्पष्टपणे सांगतो की जंगले नष्ट करू नये (VIII.१.१३). अथर्ववेद म्हणतो: ‘पृथ्वी ही सृष्टीची रक्षक आहे, जंगले, झाडे आणि वनौषधींची धारक आहे’ (XII.१.५७-६१). वनस्पतींमध्येही जीव आहे (XII.१.५७–६१); ‘वनस्पती आणि वनौषधी, विष (प्रदूषक) नष्ट करतात’ (VIII.७.१0); ‘वातावरणाची शुद्धता, विषबाधा (प्रदूषण) नियंत्रणात राखते’ (VIII.२.२५); आणि ‘वनस्पतींमध्ये सर्व इतिकर्तव्यांचे गुण आहेत आणि त्या  मानवतेचे रक्षणकर्त्या आहेत’ (VIII.७.४).

जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज भगवान शिव, त्यांची पत्नी पार्वती आणि त्यांची दोन मुले कार्तिकेय आणि गणेश यांच्या कुटुंब आणि निवासस्थनाच्या प्रतिनिधिक उदाहरणातून दिसून येते. शिवाचे निवासस्थान कैलास पर्वत आहे, ज्यामध्ये हिमशिखरे वैश्विक स्वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. त्याच्या कपाळावरची चंद्रकोर शांतता दर्शवते; त्याच्या डोक्यावरील जटेतून सतत वाहणारा गंगेच्या पाण्याचा प्रवाह पाण्याची शुद्धता आणि महत्त्व दर्शवितो; नंदी, त्याचे वाहन, प्राण्यांच्या जगाचे प्रतिनिधित्व करतो; सर्प निसर्गात विषारीपणाचे अस्तित्व दर्शवतात; त्याची पत्नी पार्वतीचे वाहन असलेला सिंह वन्यजीवांचे प्रतिनिधित्व करतो; कार्तिकेयाचे वाहन, मोर, पक्षी प्रजातींचे प्रतिनिधित्व करतो; आणि गणेशाचे वाहन, उंदीर, लहान भूमिगत प्राण्यांचे प्रतिनिधित्व करतो. भगवान शिवाच्या पवित्र निवासस्थानात विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी राहतात. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे नैसर्गिक शत्रूंमधील सुसंवादी संबंध. भगवान शिवाच्या घरामध्ये विविध नैसर्गिक शत्रू एकमेकांशी सहकार्याने राहतात. मांसाहारी सिंहाचे अन्न शाकाहारी बैल आहे, मोर हा नागाचा शत्रू आहे आणि उंदीर हे नागाचे अन्न आहे; तरीही, सर्व एकत्र राहतात.

हिंदू परंपरा ही गोष्ट स्वीकारतात की सर्व जीवसृष्टी–मानव, प्राणी आणि वनस्पती–समान आणि पवित्र आहेत, आणि त्यामुळेच त्या जंगलतोड, प्राण्यांची सघन शेती, ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल यासारख्या आताच्या समस्यांना तोंड देण्यासाठी आजही समर्थ आहेत. जंगले-वने हे भारतीय संस्कृतीच्या नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहेत, जी प्रकृतीतील स्त्री-तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतात. ती जीवन आणि प्रजननक्षमतेचे प्राथमिक स्त्रोत आहेत, भटक्यांसाठी आश्रय आणि साधकासाठी एक घर आहेत आणि त्यांच्याकडे नेहमीच सामाजिक आणि सभ्यतेच्या उत्क्रांतीचे आदर्श म्हणून पाहिले गेले आहे. जंगले ही जीवनाचे आणि प्रेरणेचे प्राथमिक स्त्रोत होते, भीती वाटावी किंवा वश करुन घ्यावीत असे घनघोर ओसाड प्रदेश नव्हते.

हिंदू तत्त्वज्ञानाचा असा विश्वास आहे की पृथ्वी आणि सर्व जीवसृष्टी – मानव, प्राणी आणि वनस्पती–– हे देवत्वाचा एक भाग आहेत. मनुष्य या जीवन प्रकारांमधून उत्क्रांत झाला आणि तो याच सर्जनशील प्रक्रियेचा एक भाग आहे, तो वेगळाही नाही किंवा श्रेष्ठही  नाही. आपल्याला उपलब्ध असलेल्या संसाधनांचा अवाजवी वाटा न घेता, आपण आपल्या भौतिक वासना सौम्य करण्यासाठी आपली जीवनशैली आणि सवयी बदलल्या पाहिजेत.  कर्म (कर्तव्य) आणि जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म चक्र हे पृथ्वी आणि जंगलांचे रक्षण करण्याचे मुख्य तत्व आहेत हे समजून घेऊन कार्य करावे. ‘सर्व काही दैवी आहे,’ भगवद्गीता हे सांगते.

वनमहोत्सव (वृक्षारोपण समारंभ) ही एक प्राचीन परंपरा आहे. मत्स्यपुराणात याबद्दल उल्लेख आहे. वृक्षारोपण आणि उद्याने निर्माण केल्याने पापक्षालन होते, असे अग्नि पुराणात म्हटले आहे. पद्म पुराणात (५६.४०-४१) म्हटले आहे की हिरवे झाड तोडणे हा नरकात दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे जंगलाचे रक्षण करणे आणि त्याचा विस्तार करणे हे पवित्र कर्तव्य मानले गेले.

निसर्गाचा आदिम किंवा वैश्विक पदार्थ पाच तत्वांनी बनलेला आहे-- पृथ्वी , वायु, अग्नि (किंवा ऊर्जा), आप (पाणी) आणि आकाश (अंतराळ) – यांना पंच-महा-भूते म्हणून ओळखले जाते. त्यांचे योग्य संतुलन आणि सुसंवाद मानवजातीच्या कल्याणासाठी आवश्यक आहे, आणि या सुसंवादाची कायम राखण करणे हा आपला धर्म किंवा नैतिक कर्तव्य आहे.

संदर्भ: नंदिथा कृष्णा लिखित Hinduism and Nature या पुस्तकातील काही उल्लेखांचा सहज अनुवाद

चित्र स्रोत: Vanarambh

हे पुस्तक वाचलेच पाहिजे:

हे सुद्धा वाचा: भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग १

Share To:

1 Response

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...