शिकार ते शेती
सध्याचा मानवाचा औद्योगिक समाज हा दोन-तीनशे वर्षातील आहे. यापूर्वी दहा हजार वर्षे मानव शेतीच करीत होता. त्या आधी पस्तीस लाख वर्षे मानव शिकारी व फलशोधकच होता. व इतर प्राण्यांप्रमाणे अन्नासाठी पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून होता. त्याच्या चार हजार किंवा जास्त पिढ्या शिकारी अवस्थेत होत्या. त्या कालात तो कसा रहात होता याची माहिती आपल्याला नाही. परंतु गेल्या शतकापर्यंत अनेक ठिकाणी मानव शिकारी व फलशोधक अवस्थेत होता.
उदाहरणार्थ,ऑस्ट्रेलिया खंडात तेथील आदिवासी हजारो वर्षे रहात असला तरीही त्याला युरोपियन तेथे जाईपर्यंत शेतीचा किंवा कुंभारकामाचा शोधच लागला नव्हता. टास्मानिया बेटातील आदिवासी एकोणिसाव्या शतकातही तीन लाख वर्षांपूर्वी मानव वापरत होता तशीच दगडाची हत्यारे वापरतांना आढळला. लाखो वर्षांपूर्वी दगडाच्या हत्यारांना नुसता दांडा बसवण्याचा शोधही माणसांना लागला नव्हता. तसेच मानवाला अग्नीचा शोध लागून चार लाख वर्षे झाली हे आता कार्बन चौदा परीक्षणाने सिद्ध झाले आहे. तरीही एकोणिसाव्या शतकापर्यंत अग्नी न वापरणाऱ्या तीन जमाती या पृथ्वीवर होत्या. हे सर्व आश्चर्यकारक वाटले तरी खरे आहे. त्यांच्याकडून गोळा केलेल्या पुराव्यावरून मानवाच्या शिकारी व फलशोधक जीवनाची कल्पना आपल्याला करता येते. आज एकविसाव्या शतकातही एक लक्ष मानव शिकारी अवस्थेत राहिला आहे.
अर्थात हा लोकसंख्येचा अतिशय अल्प भाग आहे. कारण या पृथ्वीवरील मानवाची संख्या आता आठशे कोटीपर्यंत पोहोचली आहे. शिकारी व फलशोधक मानवाच्या लाखो वर्षातील आयुष्यक्रमाचे यथार्थ चित्र या पुस्तकात रेखाटण्याचा प्रयत्न करून पाहिला आहे.
मानवाची प्रवृत्ती घडी न बदलण्याची आहे. शेवटच्या हिमयुगानंतर पृथ्वीच्या हवामानात बदल झाला नसता तर आजही माणूस शिकारी व फलशोधक अवस्थेतच राहिला असता. हिमयुगानंतरच्या कालखंडात शेतीची सुरुवात कशी झाली असावी याचाही मागोवा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हा विषय शास्त्रीय असला तरी मनोरंजक करण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
पस्तीस लाख वर्षे मानव शिकारी व फलशोधकच होता! म्हणजे त्या परिस्थितीत मानव प्रजाती पस्तीस लाख वर्षे टिकून राहिली पण गेल्या दोन-तीनशे वर्षाच्या आपल्याच कार्य-कर्तृत्वाने पृथ्वी आणि मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर आली आहे असे लक्षात येऊ लागले आहे. मग शिकारी आणि फलशोधक अवस्थेतील मानव प्रगत की आपण प्रगत? या पुस्तकातून आपण नाक्कीच बरंच काही शिकू शकू!
हे देखील वाचा: निसर्गायण, सम्यक विकास