लागवड
पुस्तक: लागवड
लेखिका: केतकी घाटे व मानसी करंदीकर
गेल्या काही वर्षात निसर्ग, पर्यावरण संवर्धन या विषयाला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे . माणसाच्या विकासाच्या रेट्यात निसर्ग संवर्धनाकरता अनेक लोक निरनिराळ्या पातळ्यांवर आपापल्या परीने उत्तम काम करत आहेत. ह्याची सुरुवात लिखाण, चळवळी, प्रदर्शने, ह्यांनी झाली, पुढे लोकांना निसर्गात नेऊन निसर्ग समजावून देऊन त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न, ह्याचा परिणाम चांगल्या योजना, धोरणे निर्माण होण्यात झाला. आणि जाणीव वाढल्याने लोकांचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.
ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे पुढे जमिनीवर प्रत्यक्ष काम सुरु झाले. याच अनुषंगाने झाडांची लागवड करण्याचे महत्त्व सर्व स्तरांमध्ये वाढले आहे. लागवडीच्या बाबतीत चर्चा, लेख, पोस्टर्स, झाडांच्या याद्या बनवून पसरविणे, प्रत्यक्ष लागवडीचे कार्यक्रम इत्यादी अनेक स्तुत्य उपक्रमांनी जोर धरला आहे. व्हॉटसअॅप, फेसबुक, इत्यादीमुळे यात विशेष भर पडते आहे. लोक लागवड करताना झाडांसोबत, मातीत हात घातलेले असे अनेक फोटो पोस्ट करत असतात. लागवड करणे ही तर चांगलीच गोष्ट आहे. पण तरीदेखील यात काही तांत्रिक त्रुटी आहेत असे दिसते. त्याकरता कोणालाच दोष देणे योग्य नाही किंवा तो उद्देशही नाही.
आपल्या एकंदरच शिक्षणव्यवस्थेत तसेही निसर्गाकडे का बघा, कसे बघा, त्याचा मानवी जीवनाशी काय संबंध आहे, संवर्धन म्हणजे नक्की काय, ते नक्की कसे करायचे, याची खुली, थेट आणि योग्य उत्तरे मिळत नाहीत. अलीकडे हा प्रयत्न सुरु झालेला दिसतो. परंतु याला सर्वदूर रुजायला बराच काळ जावा लागेल. त्यामुळे सध्या यात चुका घडत आहेत हे स्वाभाविकच वाटते. या चुका घडू नयेत किंवा कमी कराव्यात याकरता अनेक तज्ञ, संस्था आपापल्या परीने काम करत आहेत. अशाच काही तज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले आणि निसर्गाकरता प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्याची संधी घेता आली. यामुळे आत्तापर्यंत जो काही अनुभव गाठीशी बांधला गेला त्यावरून एखाद्या जमिनीवर निसर्ग फुलवण्याकरता शास्त्रीय किंवा तार्किक अशी मार्गदर्शनपर मांडणी करता आली. या दृष्टीकोनाने निसर्गाकडे पाहून लागवड केल्यास निसर्गाला निश्चित फायदा होतो.
तो फायदा कसा हे समजून घेऊयात ‘लागवड’ या पुस्तकात.
आपल्याला रोजचे आयुष्य जगण्यासाठी ज्या काय वस्तू लागतात त्या सर्व निसर्गातून उपसल्या जाणाऱ्या कच्च्या मालापासूनच बनतात. यात नैसर्गिक संसाधनाच्या बरोबरीने जीविधादेखील वापरली जातेच. ही जीविधता जर चिरंतन वापरायची असेल तर ती टिकवण्याशिवाय पर्याय नाही.
इतिहास सांगतो, निसर्गात मोठे हवामान बदल झाले तर जाती नामशेष होतात आणि जीवसृष्टी पुनश्च स्थिर व्हायला खूप मोठा काळ जावा लागतो. आणि हे जे काय बदल पूर्वी पृथ्वीवर झाले ते काही कुण्या एका जातीमुळे घडले असे पुरावे दिसत नाहीत. तर ते निसर्गतः झाले. डायनासोर नाहीसे झाले कारण पृथ्वीवर उल्का आपटल्यामुळे आणि ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे हवामान बदल झाला आणि त्यात ते टिकू शकले नाहीत. हवामान बदल हा नैसर्गिक असूच शकतो परंतु त्याचा वेग आणि प्रमाण माणसाने न भूतो असे वाढवले आहे. आणि नेमक्या याच कारणामुळे माणसाला जीविधतेचा भाग म्हणायचे की नाही असा प्रश्न पडतो. - केतकी घाटे व मानसी करंदीकर