Email: [email protected]    Website Language: English / मराठी

शिवराय आणि वृक्षवल्ली

गडावरील झाडें जीं असतील तीं राखावीं...
06
Jun

शिवराय आणि वृक्षवल्ली

६ जून, छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने…

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ‘स्वराज्य’ संस्थापक, महाराष्ट्राचे आद्य जनक, आपले आदर्श व आराध्य दैवत. देशाच्या क्षितीजावर उगवलेला शिवसूर्यच. तर महाराजांनी व त्यांच्या शूरवीर मावळ्यांनी निर्मिलेले स्वराज्य कसे होते? याबद्दल त्या काळात लिहिलेल्या काही ग्रंथांमधून आणि त्यावेळच्या पत्रव्यवहारातून आपल्याला माहिती मिळते.

तसे मराठी वाङमयात राज्यशास्त्राचे तात्विक विवेचन करणारे ग्रंथ कमी आहेत. मराठी भाषेत उपलब्ध काही ग्रंथ म्हणजे चिटणीसांची ‘राजनिती’ आणि दुसरा रामचंद्रपंत अमात्यांचा ‘आज्ञापत्र’.

आज्ञापत्र या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विषयाचा बारीकसारीक तपशील अत्यंत सुबक पद्धतीने यात मांडला आहे. ‘राजियाचे कैंसें बोलणें, चालणें’ असावे, नोकर-चाकरांशी राजाने कसे वागावे, प्रधानाची कर्तव्ये, कारभारी मंडळींची निवड, इतर सत्तांशी कसे वागावे, गड कसे जपावे, आरमार कसे वाढवावे, एवढेच नाही तर गडावरील व परिसरातील झाडे- झुडुपे यांचे रक्षण का करावे याविषयींची महाराजांची वचने यात काळजीपूर्वक जतन केली आहेत.

मरगळलेल्या मराठी माणसाला उभारी देणारा ‘स्वराज्याचा’ महामंत्र महाराजांनी दिला, आणि आज्ञापत्रातील भाषेंत सांगावयाचे तर ‘नूतन सृष्टीच निर्माण केली’.

या नूतन सृष्टीमध्ये महाराज स्वतः, प्रत्यक्ष ‘सृष्टी’बद्दल काय विचार करत होते?

आज्ञापत्रातील दुर्गांसंबंधीच्या विभागात खालील उल्लेख आहेत.

गडावरील झाडें जीं असतील तीं राखावीं यावीरहीत आंबे फणस चीचा वड पींपळ आदीकरून थोर वृक्ष व नींबें नारिगें आदीकरून लहान वृक्ष तैसेंच पूष्पवृक्ष व वल्ली कींबहूना प्रयोजक अप्रयोजक जें झाड होत आसेल तें गडावरी लावावे जतन करावे

गडाची राखण म्हणजे कमरग्याची झाडी ते झाडी प्रयत्ने वाढवावी त्यामध्यें येक काठी तेही तोडू न द्यावी बलकूबलीस या झाडीमध्यें हषम बंदूखी घालावया कारणें जागे असो द्यावे

आज्ञापत्रातील आरमारासंबंधीच्या विभागात खालील उल्लेख आहे.

आरमारास तख्ते सोट डोलाच्या काठ्या आदीकरून थोर लाकूड असावे लागते ते आपले राज्यात सातवानादी (सागवानादी) वृक्ष आहेत त्याचें जे आनकूल पडेल तें हूजूर लेहून हूजूरचे परवानगीने तोडून न्यावे यावीरहीत जे लागेल ते परमूलकीहून खरेदी करून आणवीत जावें स्वराज्यातील अंबे (आंबे) फणस आदीकरून हे ही लाकडें आरमाराचे प्रयोजनाचीं परंतू त्यास हात लाऊ न द्यावा काये म्हणोन की ही झाडें वर्षा दों वर्षानी होतात यैसें नाहीं रयतेने हीं झाडें लाऊन लेंकरांसारखी बहूत काल जतन करून वाढवीलीं ती झाडें तोडीली यावरी त्याचे दूःखास पारावार काये येकास दूःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारा सहीत स्वल्पकालेच बूडोन नाहीसेंच होतें कींबहूना धण्याचेच पदरी प्रज्यापीडणाचा दोष पडतो या वृक्षांच्या अभावें हानीही होते याकरीता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी कदाचीत यखादे झाड जें बहूत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धण्यास राजी करून द्रव्य घेऊन त्याच्या संतोषें तोडून न्यावे

ज्या काळात अस्थिरतेमुळे, परकीय व स्वकीयांच्या आक्रमणांमुळे माणसाच्या जगण्याची शाश्वती नव्हती, आज आहे तर उद्या नाही अशी स्थिती होती तेंव्हा एक राजा आणि त्याची प्रजा झाडांना जगवा, झाडे जगविणाऱ्यांना त्रास होईल असे काही करू नका हा संदेश देत होते, तो अमलात आणत होते.

यातून काय शिकण्यासारखे आहे?

आजच्या इतके सामाजिक स्थैर्य गेल्या एक हजार वर्षात पहिल्यांदाच आले असेल मग असे असताना आपण व्यष्टी (व्यक्ती), समष्टी (समाज) व सृष्टी या सर्वांचा विचार करत आहोत का? कुणी म्हणेल 'यथा राजा तथा प्रजा'. नाही! ही म्हण राजेशाही होती तोपर्यंत ठीक होती. आज लोकशाही असल्यामुळे 'यथा प्रजा तथा राजा (राज्यकर्ता)' ही म्हण योग्य आहे.

त्यामुळे चला, काही बदल करावयाचा असेल तर आपण मुलांना, पुढील पिढ्यांना व्यष्टी, समष्टी व सृष्टी या सर्वांचा एकत्रितपणे विचार करायला शिकवूया!

Share To:

1 Response

  1. संतोष उंबरे

    आजच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन महाराजांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून निसर्ग जपूयात.

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...