‘काजवा महोत्सवा’ची आजची परिस्थिती

साधारणपणे पावसाळ्याच्या आधी जंगलांमधुन आणि खेडेगावांच्या आजुबाजुला असलेल्या झाडा-झुडुपांमधुन निसर्गाचा एक अभूतपूर्व उत्सव सुरु होतो. हा उत्सव असतो तो सगळीकडे चमचमणाऱ्या काजव्यांचा. त्यांचा हा सोहळा अवर्णणीय असतो. खरंतर पावसाळ्याच्या सुरुवातीचा हा काळ म्हणजे काजव्यांच्या प्रजननाचा अत्यंत महत्वाचा काळ. त्यावरच काजवा प्रजातींचे भवितव्य अवलंबून असते. काही प्रजातींमध्ये नर आणि मादी काजवे दोन्ही चमचमतात तर काही प्रजातींमध्ये फक्त नर काजवे मादी काजव्यांना आकर्षित करण्यासाठी चमचमतात. आपल्यासाठी ही घटना डोळ्याचे पारणे फेडणारी असते पण काजव्यांसाठी तीच घटना असते एक जीवनसंघर्ष! कारण यातूनच त्यांची पुढील पिढी तयार होणार असते आणि त्यांच्यासाठी ही वर्षातील एकमेव संधी असते.
आम्ही शहरी लोक मात्र या घटनेचा अनुभव घेऊ शकत नाही कारण आम्ही शहरात इतर सजीवांना जगता येईल अशी परिस्थितीच शिल्लक ठेवलेली नाही. मग आम्हाला कुठून तरी कळते की अमुक-अमुक गावाजवळ दर वर्षी खुप काजवे येतात. शहरातील निसर्ग आधीच उध्वस्त केलेले आम्ही मग निसर्ग वाचला पाहिजे, सर्वांना काजव्यांच्या या उत्सवाचा आनंद मिळून निसर्गाविषयी प्रेम निर्माण झाले पाहिजे, खेडेगावातील लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे या आलेल्या की आव आणलेल्या उपरतीच्या पडद्याआडून काजवे पहायला जाण्याचे प्रमाणपत्र घेतो – स्वहस्तेच!
काही वर्षांपूर्वी आम्ही शहरवासीयांनी हे काजवे पहायला जाण्याच्या कार्यक्रमाला किंवा काजव्यांच्या या सम्मेलनाला एक गोंडस नाव दिले – ‘काजवा महोत्सव’. काही निसर्गप्रेमी मंडळींनी लोकांना निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावे यासाठी काजवे, झाडे, वातावरण, इतर सजीव आणि आपण माणसेही एकमेकांवर कसे अवलंबून आहोत हे या महोत्सवाच्या माध्यमातून मनापासून सांगण्यास सुरुवात केली आणि त्यांना त्यात थोडेफार यश आले असेलही. पण मग आपला मूळ स्वार्थी स्वभाव दाखवणार नाही, गोष्टीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणार नाही तर मग तो मनुष्यप्राणी कसला? गेल्या काही वर्षांत काजव्यांच्या या महोत्सवाचे निमित्त साधून आपल्या चंगळवादी प्रवृत्तीचे दर्शन पुन्हा घडविण्यास आम्ही शहरवासियांनी सुरुवात केली आहे.
निसर्गप्रेमी मंडळींनी काजव्यांबद्दलची अत्यंत तळमळीने सांगितलेली माहिती दुर्लक्षित करून इतर ठिकाणी काजवे पहायला गेल्यावर वाटेल तसे वागणारे, मोठ मोठे टॉर्च लाइट घेऊन फिरणारे व काजव्यांकडे ढुंकूनही न पाहणारे पर्यटक (की ज्यांना या गोष्टीची सुद्धा फिकीर नसते की त्या टॉर्च लाइटचा काजव्यांवर काय परिणाम होईल), काजव्यांना निष्काळजीपणे पायदळी तुडवणारे महाभाग, काजव्यांबद्दल पहिल्यांदाच काही कळाल्यामुळे त्यांना उगाचच हाताळणारे स्वयंघोषित ‘काजवा संशोधक’, प्रचंड गर्दी, म्युझिक प्लेयर्सचे थैमान, त्यांभोवती चाललेला धिंगाणा, खाण्याची रेलचेल, जंगलातून रात्रीची गाड्यांची वाहतुक, सर्वत्र पडलेला कचरा, अशा दुर्दैवी परिस्थितीतही काजव्यांच्या झगमगाटाचा फोटो काढण्याचा अट्टाहास धरणारे हौशी प्रकाशचित्रकार (फोटोग्राफर्स), बेजबाबदार आयोजक आणि हतबल यजमान हे काजवा महोत्सवाचे आजचे विदारक रुप आहे आणि आम्ही ते अत्यंत जवळून पाहिले आहे. बरं आम्ही केलेल्या या अपराधांची आम्हाला कधी जाणीवसुद्धा होत नाही. आपलं काहीतरी चुकलंय हे तर कधी लक्षातही येत नाही. काजवा महोत्सवांचे आता काजवा बाजार झाले आहेत! काजवे आणि निसर्गाचे संवर्धन तर दूरच पण उरल्यासुरल्या नैसर्गिक अधिवासांचाही विनाश आम्ही सुरू केला आहे. निसर्गनियम पाळून, काजव्यांना आणि निशाचर जीवांना कोणताही अडथळा न आणता साजरे होणारे काजवा महोत्सव म्हणजे अपवादच. त्यातून होणारा फायदा आणि पर्यटकांच्या अनिर्बंध वागण्यातून होणारे अतोनात नुकसान यांचे प्रमाण दुर्दैवाने कायमच व्यस्त.
इथे विनयशीलपणे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की प्राचीन काळी गुरू शिष्याला दिव्यास्त्र हातात देऊन मग त्यांचे वापर शिकवीत नव्हते तर प्रत्येक शिष्य आधी कसोटीच्या पातळीवर वाखाणला जायचा आणि मगच गुरू ठरवित असत की कोण कशास पात्र आहे, योग्य आहे. त्यानंतरच ती विद्या शिष्याला दिली जात होती. आताच्या काळातही ही गोष्ट लागू होते. कुणाला वनविद्या शिकवायची असेल किंवा निसर्गाचा कमीतकमी नि:खळ आनंद घ्यायला शिकवायचे असेल तर मूलभूत गोष्टींपासुन सुरुवात करायला हवी. काजवे हे वनविद्येतील खुप पुढचा टप्पा आहेत कारण ज्यांना सृष्टीचे जीवनचक्रच नीट समजलेले नाही त्या सरसकट सर्वांना काजव्यांच्या अधिवासात आमंत्रित करून जणू एक दिव्यास्त्रच त्यांच्या हातात दिले जात आहे. ज्याचा विधायक उपयोग कसा करायचा, निर्भेळ आनंद कसा घ्यायचा याबद्दलची आवश्यक असणारी परिपक्वता सुद्धा प्रत्येकामध्ये नाही.
त्यामुळे अशी वनविद्या उठसूठ कोणालाही देऊन चालणार नाही. मूळ उद्देशापासुन दूर गेलेल्या या तथाकथित काजवा महोत्सवांना, नव्हे बाजारांना, निसर्गप्रेमींनीच आता पूर्णविराम द्यायला हवा.
संबंधित: चिमण्यांच्या हरवलेल्या जगाच्या शोधात