कोंकण – मौज आणि मस्ती की मौज आणि संस्कृती?
माणसाने गाव सोडला आणि शहराचा रस्ता धरला. काही वर्षांतच त्याच्या हे लक्षात आले की शहरांच्या झगमगाटाच्या दुनियेत पैसा तर मिळतोय पण खेड्यांत मिळणारे निसर्गसानिध्य, माणसाला माणसाची साथ आणि त्यातून मिळणारी शांतता व समाधान, शोधूनही सापडत नाहीये. शहरातील एकंदरीत वातावरणाचा आणि कामाचा ताण घालविण्यासाठी जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा आम्ही शहरी लोक खेड्याकडे धावत सुटतो आहोत. सुरुवातीला ही कल्पना छान वाटली कारण यामुळे शहरी माणसाच्या मनात खेड्यांबद्दल, निसर्गाबद्दल आपुलकी शिल्लक राहील आणि माणसाची विनाशाकडे चाललेली वाटचाल धीमी होईल किंवा हळूहळू थांबेल अशी आशा निर्माण झाली होती.
जेव्हा शहरी माणसाचा ओढा पुन्हा गावाकडे किंवा निसर्गाकडे दिसू लागला तशी गावाकडे जाण्याची खालील कारणे द्यायला सुरुवात झाली
१. निसर्गाच्या सान्निध्यात प्राणवायू भरभरून मिळाल्याने, शांतता लाभल्याने मनावरील ताण हलका होतो आणि नवा उत्साह निर्माण होतो.
२. गावातील लोकांना विविध प्रकारे रोजगार निर्माण होऊन, पैसा मिळतो आणि त्यांचे कष्टप्रद जीवन सुसह्य होते.
३. शहरांतील निसर्ग तर नष्ट झालाच आहे परंतु गावाकडे जात राहिल्याने माणसाचे निसर्गावरील प्रेम वाढत राहील आणि निसर्गाचा आणि त्यातून माणसाचाही होणारा विनाश टळेल अथवा कमीत कमी लांबेल.
४. गावांकडील संस्कृती आणि सभ्यता – विविध लोककला, संगीत, श्रद्धा आणि परंपरा, गावाची श्रद्धास्थाने – ग्रामदैवते, मंदिरे, सण, अन्नसंस्कृती, वस्त्र-संस्कृती, इतिहास, भाषा यांचे सतत दर्शन होत राहिल्याने शहरावरील पाश्चिमात्य संस्कृतीचा पडलेला प्रभाव किंवा पाश्चिमात्य संस्कृतीतील त्याही फक्त स्वतःला सोयीस्कर अशाच, उचललेल्या गोष्टी कमी होत जाऊन शहरातील माणसे स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण ठेवायला शिकतील.
हे सर्व वाचायला जरी अत्यंत प्रेरणादायक वाटत असले तरी प्रत्यक्षात निर्माण झालेले चित्र खुपच वेगळे आहे. खालील संवाद वाचा
संवाद क्र. १
मित्र १: मागील आठवड्यात ऑफिस मध्ये गप्पा मारता मारता सर्वांनी ठरवून टाकले वीकेंडला कोकणातील आपल्या शहराजवळच असलेल्या दिवेआगरला जायचे.
मित्र २: अरे वा! मग कशी झाली ट्रिप ? कुठे राहिलात ? दिवेआगर मधील स्थानिक माणसाने बांधलेल्या एकाद्या homestay मध्येच राहिलात का?
मित्र १: छे! इथून निघताना दहा क्रेट भरून घेतले आणि निघाल्यापासून जे प्यायला सुरुवात केली ते अगदी तिकडे पोहोचेपर्यंत पिणे सुरूच होते. राहायला बीचला खेटून असलेले एक रिसॉर्ट बुक केले होते. ते पुण्या-मुंबईकडील कोणा माणसाने तिथे जागा विकत घेऊन सुरु केलेले होते आणि तिथे पुण्या-मुंबईतल्या हॉटेल्स मध्ये असतात तशा सोयी होत्या.
मित्र २: हम्म! दिवेआगर मध्ये बाकी काय काय केले? काय काय पाहिले? जवळच हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन सारखी ठिकाणेही आहेत तिकडेही गेला होतात का?
मित्र १: दिवस रात्र खाणे, दारू पिणे आणि पत्त्यांचे डाव सुरु होते. रिसॉर्ट बाहेर समुद्र किनाऱ्यावर एकदा फेरफटका मारून पाण्यात भिजून आलो.
मित्र २: ओह! अरे पण दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर ही स्थाने नितांतसुंदर समुद्रकिनारे, कोकणी बाजाची टुमदार घरे, मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेली आणि अनेक प्राचीन मंदिरे असलेली स्थळे आहेत. हरिहरेश्वर तर दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते. अशा पवित्र ठिकाणी जाऊन हे करण्यापेक्षा शहरातच एकादे हॉटेल बुक करायचे ना मग!
मित्र १: असल्या गोष्टींना आपल्याकडे वेळ आहे का ? खाओ, पिओ आणि मजा करो ! कशाला उगाच टेन्शन घेतोस ?
संवाद क्र. २
मैत्रीण १: या वीकेंडला आम्ही सर्व कोकणात दिवेआगरला जाणार आहोत. ३-४ families मिळून जाणार आहोत. यांना सांगितले चांगले रिसॉर्ट बुक करा.
मैत्रीण २: चांगले रिसॉर्ट म्हणजे ? अगं तिथे घरोघरी गावातील लोकांनी सुरु केलेले homestay आहेत ना. छानच व्यवस्था असते तिथेही. कोकणी थाटाचे टुमदार घर, कोकणी पद्धतीचे जेवण…
मैत्रीण १: (मैत्रिणीला मध्येच थांबवत) छे छे! कोकणात दमट वातावरणामुळे A.C. शिवाय राहावतच नाही गं. मुलांना तर स्वीमिंग पूल पाहिजेच आणि कसल्या त्या कोकणी पद्धतीच्या साध्या घरात राहायचे? आणि जेवणाचे म्हणशील तर यांना आणि मला ना जेवण पंजाबी, चायनीज किंवा वेस्टर्न पद्धतीचेच लागते.
मैत्रीण २: बर पण दिवेआगर मध्ये समुद्राशिवाय आणि रिसॉर्टशिवाय बऱ्याच गोष्टी आहेत. दिवेआगर गावाला इतिहास आहे, स्थानिक उत्सव आहेत. शिवाय तिथल्या बायकांशी आपण स्वतः संवाद साधून त्या कशा राहतात, त्यांची वेशभूषा, त्यांची पाककला, त्यांच्या श्रद्धा आणि श्रद्धास्थाने जाणून घेता येतात .
मैत्रीण १: तिथल्या बायकांशी संवाद कसला? त्यांची आणि आमची wavelength कुठेतरी जुळणार आहे का ? त्यांची खेडवळ वेशभूषा आणि आमची मॉडर्न वेशभूषा यांची तुलना तरी होते का? T.V. वर पहात नाहीस का युरोप-अमेरिकेतील बायका बीच वर कशा वावरतात, तिथे गेल्यावर आपण निदान थोडे तरी आणखी मॉडर्न दिसायला हवे ना! मी माझ्या इन्स्टा स्टोरीझसाठी काही छान पोशाख निवडण्यात व्यस्त आहे. माझे रील अगदी त्या युरोपियन समुद्रकिनाऱ्यांसारखे दिसतील. कोणाकडे अशा स्थानिक कपडे आणि सर्व मूर्खपणासाठी वेळ आहे? पाककला म्हणशील तर माझा स्वतःचा चायनीज आणि इटालियन फूड चा youtube चॅनेल आहे आणि आमची फक्त पैशांवर श्रद्धा आहे.
मैत्रीण २: बरं पण मग निदान तिथे असलेली श्रीसुवर्ण गणेश, श्रीउत्तरेश्वर, श्रीकालभैरव, श्रीसिद्धेश्वर आणि श्रीरुपनारायण ही प्राचीन मंदिरे तरी आवर्जून पाहून या. श्रीरुपनारायणाची म्हणजे भगवान श्रीविष्णूची दगडात कोरलेली प्राचीन मूर्ती तर इतकी सुबक आणि सुंदर आहे की पाहून वाटते प्रत्यक्ष भगवान आपल्याशी आता बोलायलाच लागतील. मूर्तीच्या डाव्या, उजव्या आणि वरील बाजूला दशावतारही कोरलेले आहेत. हे सर्व पाहून मन प्रसन्न होऊन जाते आणि आपल्या मुलांनाही समृद्ध अशा भारतीय संस्कृतीची ओळख होते.
एवढेच नाही तर गावांत साजऱ्या होणाऱ्या सण-उत्सव, उरुस यांची गावातल्या लोकांकडून माहिती मिळाल्याने मुलांना लोककलेची, संगीताची जाण राहते.
तिथल्या घरांच्या मागे-पुढे असलेल्या बागेतील जैव-विविधतेची मुलांना ओळख करुन दिल्याने मुले आपोआपच अंतर्मुख होतात आणि विनम्रता, कृतज्ञता या गोष्टी त्यांच्यात आपोआपच वाढीस लागतात.
मैत्रीण १: ए बाई ! तू तर अगदी ऑर्थोडॉक्स आहेस बघ. माझी मुले मंदिरात नाही पब मध्ये जातात, पॉप आणि जॅझ शिवाय काही ऐकत नाहीत. जैव-विविधतेच्या जाणिवेची काय गरज आहे ? ती आमची priority नाही. इथे शहरात डोक्याला इतका ताप आहे मग अशा ठिकाणी जाऊन एन्जॉय करा आणि परत घरी येऊन आपले routine सुरु करा एवढाच विचार आम्ही करतो.
असे संवाद सर्वांनीच थोड्याफार फरकाने ऐकलेले किंवा बोललेले असतील. पण जर यावर कोणी अंतर्मुख होऊन विचार करायची सुद्धा तसदी घेणार नसेल तर मग काय उपयोग ?
शहरे तर बकाल झाली आहेतच पण शहरी माणसाच्या मनुष्यकेंद्रीत, स्वार्थी आणि स्वतःला सोयीस्कर अशा पाश्चिमात्य विचारांच्या अनुकरणामुळे गावेसुद्धा बकाल होण्याच्या मार्गावर निघाली आहेत. शहरातून येणाऱ्या माणसाच्या नवनवीन आणि वाढत्या demands पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांची फरपट सुरु झालीये. कोकणी बाजाची घरे जाऊन विविध सुविधांनी युक्त सिमेंट-काँक्रीटच्या इमारती दिसू लागल्या आहेत. मातीच्या अंगणाची जागा सिमेंट ने घेतली आहे का तर शहरातून येणाऱ्या मुलांचे पाय मातीने भरतात. वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा देखील आवश्यक आहे. मग या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नारळी-पोफळीच्या नितांतसुंदर, आल्हाददायक, थंडावा देणाऱ्या बागा तोडल्या जात आहेत. मग त्यामुळे घामाघूम होणाऱ्या पाहुण्यांना A.C., स्वीमिंग पूल उपलब्ध करुन द्यावे लागत आहेत. मनोरंजनासाठी शहरी माणसाला स्थानिक लोककला, निसर्गातील विविध आवाज नको आहेत तर तिथेही फ्लॅटस्क्रीन T.V. आणि T.V. सिरिअल्स हव्या आहेत. तोही हट्ट पुरविला जात आहे. पण हे कोणी लक्षात घेत नाही की साधा, सामान्य गावकरी, बाहेरुन येऊन त्यांच्या गावातील मोक्याची जागा विकत घेऊन टोलेजंग रिसॉर्ट बांधणाऱ्या धनाढ्यांशी स्पर्धेत कधीच जिंकू शकणार नाहीये आणि शहरी माणसाची हावही कधीच संपणार नाहीये.
दिवेआगर जवळील हरिहरेश्वर येथे मंदिराबाहेर एक लेख मराठीत लिहिला आहे आणि तो किती बोलका आहे हे लक्षात घ्या.
“जगात देव आहे या शब्दावर विश्वास ठेवा. तो विज्ञानाच्या परीक्षानळीतून दिसणार नाही. तो श्रद्धेच्या ओंजळीतून दिसतो. ही देवभूमी आहे तिला देवभूमीच राहू द्या. धनाढ्य लोकांनी तिला गलिच्छ बनविण्याचा प्रयत्न करु नये. ग्रामदेवतेच्या रोषास पात्र व्हाल.
पर्यटकांनी बीचवर दारू पिऊ नये. दंगा-मस्ती करु नये. आपली संस्कृती जतन करावी. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करु नये. पर्यटकांनी येथे आल्यावर मदिरा-मदिराक्षीची कृपया मागणी करु नये. ती हौस घरी जाऊन पुरी करावी.
जगात लाज नावाचा प्रकार फक्त माणसालाच कळतो म्हणून लोकलाजेचे भान ठेवून बीचच्या पाण्यात आंघोळ करा. माणसाच्या जीवनात पैसा हे साधन असून साध्य फार वेगळे आहे. म्हणून एकमेकांशी सौजन्यपूर्वक वागा.”
ज्यांना ज्यांना हे कळते आहे त्या विचारी लोकांनी ही सर्व माहिती आणि परिस्थिती लहान लहान मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करायाला सुरुवात करा. मुलांचे विचार बदलणे सोपे आहे कारण मोठ्या माणसांपेक्षा त्यांच्यात ग्रहणक्षमता जास्त असते.
प्रकाशचित्र स्रोत: Vanarambh®
हे सुद्धा वाचा: भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग १