हे खरे खरे व्हावे…
हवेवरी त्या होत स्वार मी
अवकाशी विहरावे,
मनात माझ्या नेहमी येते
मी पक्षी व्हावे…
दवबिंदू होऊनी पहाटे
गवतावर उतरावे,
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी
पुन्हा पुन्हा परतावे…
क्षितिजावरचे गडद रंग मी
ढग होऊनी झुलावे,
भरारणारा होऊन वारा
चंद्राशी खेळावे…
धुक्यापरी मी अलगद अलगद
धरणीवर उतरावे,
अवघे जग झाकूनी तयाला
मिष्किलतेने पहावे…
उर्जेचा तो स्रोत सूर्य मी
अगदी जवळून पहावा,
काळोखाला चिरत चिरत मी
सूर्य किरण व्हावा…
निसर्गातल्या रंगामध्ये
मी रंगून जावे,
भास नको मज, तुम्हा सांगते
हे खरे खरे व्हावे…
– सुमती पवार
पुस्तक वाचन: किशोर मासिक
श्रेय: बालभारती, इयत्ता ६ वी
हे देखील वाचा: वाट, वाट माझ्या आजोळाची, सारे मिळूनी चला गाउया पर्यावरणाचे गीत…, आकार जीवनाला – सूत्र गीत